अहिल्यानगर-समता नगर, केडगाव येथील एका कुटुंबात क्षुल्लक कारणावरून झालेल्या घरगुती वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. बायको व बहिणीच्या भांडणातून वाद वाढला आणि वडील, बहिण, मेहुणा आणि मेहुण्याचा भाऊ यांनी मिळून सख्ख्या भावावर चाकूने वार करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जखमी सलमान चव्हाण याच्या जबाबावरून चार जणांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
घटनेतील जखमी सलमान चव्हाण (वय २०) हा वॉचमन म्हणून काम करतो आणि समता नगर, केडगाव येथे कुटुंबासोबत राहतो. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सलमान याने सिव्हिल हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार ही घटना २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी घडली.
२९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सलमानची मुलगी आणि बहिणीची मुलगी यांच्यात लहान कारणावरून भांडण झाले. या भांडणातून सलमानची बहिण सोनाली हिने मुलीला चपलेने मारण्याची धमकी दिली. यावर सलमानची पत्नी सपना हिने आक्षेप घेतला आणि दोघांमध्ये वाद झाला. या वादातून सलमानचे वडील गोरख चव्हाण यांनी सलमानला शिवीगाळ करत मारहाण केली.यामुळे व्यथित झालेला सलमान दिवसभर पाण्याच्या टाकीजवळ बसून होता. सायंकाळी ५.३० वाजता तो घरी परतला आणि त्याने घडलेला प्रकार वडिलांना व बहिणींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
सलमानने परिस्थिती हाताळण्यासाठी बाहेर गेलेल्या लहान भाऊ कोहीनूर याला फोन करून बोलावून घेतले. सलमान आणि कोहीनूर वडील, बहिण आणि मेहुणा सागर भोसले यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी अचानक त्यांच्यावर चाकूने हल्ला केला.या प्रकरणी सलमान चव्हाण याने वडील गोरख चव्हाण, बहिण, मेहुणा सागर भोसले आणि मेहुण्याचा भाऊ संकेत भोसले यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पुढील तपास महिला पोलीस अंमलदार अनिता तारडे या करत आहेत.


