अहिल्यानगर -नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील डोंगरचा मळा परिसरात ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात गावच्या सरपंच उज्वला सागर कापसे (वय ३७) यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १८ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निमगाव वाघा शिवारातील डोंगरचा मळा परिसरात उज्वला कापसे यांची शेती आहे. त्या व त्यांचे पती सागर हे शेतामधून मका भरून ट्रॅक्टरने गावाकडे येत होत्या. यावेळी ट्रॅक्टरमध्ये मका भरलेला होता आणि सरपंच कापसे ट्रॅक्टरवर बसलेल्या होत्या. दरम्यान, रस्त्यावर अचानक ब्रेक मारल्यामुळे ट्रॅक्टरचा ताबा सुटून ट्रॅक्टर पलटी झाला.
या अपघातात ट्रॅक्टर खाली दबल्या गेल्याने सरपंच उज्वला कापसे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे डोंगरचा मळा तसेच निमगाव वाघा परिसरात शोककळा पसरली आहे.
उज्वला कापसे या खा. निलेश लंके समर्थक होत्या. त्यांची ९ जुलै २०२५ रोजी बहुमताने सरपंचपदी निवड झाली होती. या पदावर काम करत असताना त्या ग्रामविकासासाठी सक्रिय होत्या. त्यांच्या अचानक झालेल्या अपघाती निधनामुळे ग्रामपंचायत तसेच गावातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. मयत कापसे यांच्या पश्चात पती, १ मुलगा, १ मुलगी, सासू सासरे असा परिवार आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.


