क्रिकेटच्या वादातून भातोडीत हाणामारी
अहिल्यानगर – तालुयातील भातोडी गावात क्रिकेटच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मोठ्या हाणामारीत झाले आहे. या घटनेत लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला असून, हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. जुन्या वादाची कुरापत काढून आरोपी शकील बबलू सय्यद, दगडू अब्दुलरहेमान शेख, फिरोज नजीर सय्यद आणि अरमान फिरोज सय्यद (सर्व राहणार भातोडी) हे हातामध्ये लाकडी दांडके, लोखंडी पाईप आणि रॉड घेऊन आले. त्यांनी फिर्यादीच्या नातेवाईकाने क्रिकेट स्पर्धेच्या वेळी केलेल्या वादाचा आणि मोबाईल फोनवर संपर्क साधल्याचा जाब विचारला. यावेळी आरोपींनी शिवीगाळ करत फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबाला धमकावले. वादाचे स्वरूप वाढल्याने आरोपींनी हातातील शस्त्रांनी बेदम मारहाण सुरू केली. या हल्ल्यात फिर्यादीच्या हाताच्या बोटावर लोखंडी रॉडचा जोरात फटका बसल्याने त्यांचे बोट मोडले असून गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार लोखंडे करत आहेत.
नगर तालुक्यातील कौडगाव येथे जुन्या वादातून दोन तरुणांनी एका शेतकर्यासह त्यांच्या आईला लोखंडी गजाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात विजय बबन नवथर आणि समाधान (पूर्ण नाव माहित नाही) या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी तुषार संतोष कदम हे शेती करून आपले जीवन जगतात. मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आरोपी विजय नवथर आणि समाधान हे दोघे हातात लोखंडी गज घेऊन फिर्यादीच्या समोर आले. ’तू लय माजला आहेस का?’ असे म्हणत आरोपींनी फिर्यादीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही समजण्याच्या आतच आरोपींनी आपल्या हातातील लोखंडी गजाने तुषार यांच्यावर हल्ला चढवला.हा वाद सोडवण्यासाठी फिर्यादीची आई मध्यस्थी करण्यासाठी आली असता, आरोपींनी त्यांनाही सोडले नाही. दोन्ही आरोपींनी फिर्यादीच्या आईला देखील लोखंडी गजाने मारहाण करून दुखापत केली. या हल्ल्यानंतर आरोपींनी फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला. जखमींना तातडीने उपचारासाठी शहरातील म्हस्के रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस नाईक कर्डक या करत आहेत.


