पुणे : राज्यात आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधु एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असताना दुसरीकडे पवार कुटुंबीयांनी एकत्र आलं पाहिजे, अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना, ‘उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आधी एकत्र तर येऊ द्या, मग काय करायचं ते ठरवू’, असं सूचक विधान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. पुण्यातील खेड राजगुरुनगरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. त्यामुळे, राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून त्यांच्या वक्तव्याचा वेगवेगळा अर्थ काढला जात आहे.
‘राज्यातील महायुती सरकार २०२९च्या लोकसभेपर्यंत टिकेल पण विधानसभा निवडणुकांवेळी मात्र महायुती तुटेल’, असं भाकीतही रोहित पवार यांनी यावेळी केलंय. रोहित पवारांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं काय चाललंय, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. कारण, ‘उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आधी एकत्र तर येऊ द्या, मग काय करायचं ते ठरवू,’ असं सूचक विधानही रोहित पवार यांनी केलं आहे. एकीकडे भाजपने संघटन पर्वच्या माध्यमातून पक्षबळकटी सुरू केली आहे. २०२९च्या निवडणुकीत एकहाती सत्ता खेचण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे यापूर्वीच त्यांच्या नेत्यांनी बोलून दाखवलं आहे. त्यामुळे रोहित पवारांचे हे वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधुंनी महाराष्ट्रासाठी एकत्र आलं पाहिजे, अशी मनसे व शिवसेना कार्यकर्त्यांची इच्छा आहे. अनेकदा बॅनरबाजी करुनही कार्यकर्त्यांनी ही इच्छा बोलून दाखवली आहे. त्याच, पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनेही एकत्र आलं पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. तर, गेल्या काही महिन्यात शरद पवार आणि अजित पवार हे विविध बैठकांच्या निमित्ताने एकत्र आल्याचेही दिसून आले.


