सूर्यनगरात दूषित पाण्याचा पूर, नागरिक त्रस्त — आठ दिवसांत उपाय न झाल्यास महापालिकेसमोर मटका फोड आंदोलनाचा इशारा
अहिल्यानगर (प्रतिनिधी): शहरातील सूर्यनगर परिसरातील रहिवासी मागील पाच ते सहा महिन्यांपासून दूषित व मैलामिश्रित पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. या दूषित पाण्यामुळे परिसरात उलटी, जुलाब, गॅस, कावीळ यांसारख्या आजारांनी नागरिकांना ग्रासले आहे. या गंभीर समस्येबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असा आरोप रहिवाशांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपच्या माजी नगरसेविका सौ. पल्लवीताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. स्वच्छ पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली. आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास महापालिकेसमोर मटका फोड आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी बोलताना पल्लवीताई जाधव म्हणाल्या, “महापालिकेचा हा दुजाभाव नागरिकांच्या आरोग्यावर घातक ठरत आहे. आम्ही निवडून आलो नाही तरी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची आमची तयारी आहे. महिलांना स्वयंपाकासाठी, पिण्यासाठी अस्वच्छ पाणी वापरावे लागते, ही लाजिरवाणी बाब आहे. जर प्रशासनाने वेळेत उपाययोजना केली नाही, तर नागरिकांसह महापालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि त्याची सर्व जबाबदारी प्रशासनावर असेल.”
विशेष म्हणजे, महापालिकेने पाणीपट्टीमध्ये वाढ केली असताना नागरिकांना अस्वच्छ पाणी प्यावे लागत आहे. जोपर्यंत स्वच्छ पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत पाणीपट्टी भरणार नाही, असा ठाम निर्णय नागरिकांनी घेतला आहे.
या निवेदनप्रसंगी सौ. शिला तळेकर, सौ. सुवर्णा फुंदे, सौ. आरती खताडे, सौ. चौधरी, सौ. रूपाली शिंदे आदी महिला उपस्थित होत्या.


