Sunday, November 2, 2025

खासदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्याला यश ,वंदे भारत एक्सप्रेस आता नगरच्या स्थानकावर !

वंदे भारत एक्सप्रेस आता नगरच्या स्थानकावर !

खासदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्याला यश

नागपूर-पुणे वंदे एक्सप्रेसला रेल्वेमंत्रालयाचा हिरवा झेंडा

अहिल्यानगर : प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आणि विशेषतः अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील प्रवाशांच्या सोयीसाठी आता नागपूर ते पुणे हे वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयाने हिरवा झेंडा दाखविला आहे. या गाडीला अहिल्यानगर येथे अधिकृत थांबा देण्यात आला असून जिल्ह्यातील प्रवाशांना आता जलद, आरामदायक आणि उच्च दर्जाच्या प्रवासाची सुविधा मिळणार असल्याचे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले.
पुणे येथे २३ जुलै रोजी पार पडलेल्या रेल्वे सल्लागार मंडळाच्या बैठकीत अहिल्यानगर स्थानकावर विविध गाड्यांना थांबा देण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी केली होती. त्याची दखल घेऊन वंदे भारत एक्सप्रेसला थांबा देण्यात आला आहे. १० ऑगस्ट रोजी नागपूरहून या रेल्वेसेवेला सुरूवात होणार असून अजनी, नागपूर येथून सोमवार वगळता आठवडयातून ६ दिवस ही गाडी पुण्याकडे प्रस्थान करणार आहे तर पुण्याहून मंगळवार वगळता आठवडयातून ६ दिवस ही गाडी अजनी, नागपूरकडे प्रस्थान करणार आहे.
अजनी, नागपूरहून पुण्याकडे जाताना या गाडीचे अहिल्यानगर स्थानकावर सायंकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी आगमन होईल व ७ वाजून ३७ मिनिटांनी पुण्याकडे प्रस्थान होईल. पुण्यहून अजनीकडे प्रस्थान करताना अहिल्यानगर स्थानकावर ही गाडी सकाळी ८ वाजून ३३ मिनिटांनी पोहचेल व ८ वाजून ३५ मिनिटांनी अजनी, नागपूरकडे प्रस्थान करेल. अजनी, नागपूर स्थानकावरून ही एक्सप्रेस सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी सुटेल तर पुण्याहून सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी नागपूरसाठी सुटणार आहे.

सकारात्मक बदल होईल

वंदे भारतसारखी उच्च दर्जाची सेवा जिल्ह्याला मिळणे ही ऐतिहासिक बाब आहे. रोजगार, शिक्षण, व्यापार,आरोग्य आणि संपर्क यामध्ये मोठया प्रमाणावर सकारात्मक बदल होईल. नागपूर आणि पुणे या दोन महत्वाच्या शहरांशी जिल्ह्याचा थेट संपर्क सुलभ होईल.

खासदार नीलेश लंके
लोकसभा सदस्य

विशेष उद्घाटन सोहळा

ही सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खा. लंके यांनी आभार माणले. ही सेवा केवळ प्रवासाचे अंतर कमी करणार नाही तर जिल्ह्याच्या सर्वागीण विकासाला चालना देणारी ठरेल असे सांगत खा. लंके यांनी सांगितले की या नव्या सेवेसंदर्भात लवकरच अहिल्यानगर स्थानकावर विशेष उद्घाटन सोहळयाचे आयोजन करण्यात येणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles