शहरातील मिरवणुका, सण-उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये होणार्या डीजेच्या प्रचंड आवाजावर अखेर पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. वारंवार सूचना देऊनही डीजेचा दणदणाट थांबत नसल्याने अहिल्यानगर शहर पोलिसांनी मंडळ अध्यक्षांसह डीजे चालक/मालकांवर थेट न्यायालयात खटले दाखल करत मोठी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे मिरवणुकीत वापरलेले सर्व डीजे साहित्य जप्त करण्यात आले असून न्यायालयाचा आदेश येईपर्यंत ते परत दिले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईमुळे शहरातील डीजे व्यावसायिक आणि मंडळांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
सण, उत्सव, लग्न सोहळे तसेच धार्मिक मिरवणुकांमध्ये डीजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेषतः शहरातून निघणार्या मिरवणुकांमध्ये डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि बंदोबस्तावर असलेले पोलीस यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र अनेकदा राजकीय हस्तक्षेप किंवा दबावामुळे अशा प्रकरणांमध्ये कारवाई होत नसल्याची चर्चा होती. यापूर्वी कारवाई झाल्यास मिरवणूक किंवा कार्यक्रम संपल्यानंतर डीजे साहित्य जप्त करून संबंधितांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले जात होते. एक-दोन दिवसांतच ते साहित्य परत मिळत असल्याने डीजे चालक/मालक पुन्हा त्याच पध्दतीने ध्वनीप्रदूषण करत असल्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी आळा बसत नव्हता.दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेतली. मिरवणुकांमध्ये डीजे वाजवू नये यासाठी संबंधित मंडळ अध्यक्ष आणि डीजे चालक/मालकांना आधीच नोटीस देण्यात आली होती. तसेच मिरवणूक मार्गावरील आवाजाची डेसिबल पातळी पंचांच्या उपस्थितीत मोजून त्याची अधिकृत नोंदही पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. तरीही नोटीस बजावूनही नियमांचे उल्लंघन करत मिरवणुकीत डीजे वाजवण्यात आल्याने मिरवणूक संपल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून सर्व डीजे साहित्य जप्त केले.
त्यानंतर संबंधित मंडळ अध्यक्ष आणि डीजे चालक/मालकांना महाराष्ट्र ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000 च्या कलम 8 अन्वये नोटीस देऊन स्पष्टीकरण सादर करण्यासाठी वेळ देण्यात आला होता. या प्रक्रियेनंतर पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत महाराष्ट्र ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000 मधील कलम 15 आणि 19 नुसार संबंधितांविरूध्द थेट न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयाचा आदेश येईपर्यंत जप्त केलेले डीजे साहित्य पोलिसांकडेच राहणार असून पुढील कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसार होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
21 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या झेंडा मिरवणुकीत डीजे वाजवल्याप्रकरणी जुलसे गरीब नमाज कमिटी, तक्ती दरवाजाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन हाफीज शेख आणि डीजे चालक/मालक जावेद आयुब शेख यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे.तसेच 19 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या शिवजयंती मिरवणुकीत डीजे वाजवल्याप्रकरणी श्री. शंभूराजे प्रतिष्ठान जनता गॅरेज मंडळ, सावेडीचे अध्यक्ष प्रतिक नवनाथ तागड आणि डीजे चालक/मालक महेश चर्तभूज कर्डिले (रा. कर्डरवाडी, ता. शिरूर, जि. पुणे), श्री. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती, नालेगावचे अध्यक्ष मयुर शुभम साठे आणि डीजे चालक/मालक सचिन वामन आयरे (रा. येरवडा, पुणे) तसेच पैलवान प्रतिष्ठान, अहिल्यानगरचे अध्यक्ष दर्शन अभय बोरा (रा. माळीवाडा) आणि डीजे चालक/मालक अनिल गणेश पोकळे (रा. पुणे) यांच्याविरूध्दही न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत.


