अहिल्यानगर :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर याला अटक करण्यासाठी न्यायालयाने स्टँडिंग वॉरंट बजावलं आहे.या कायदेशीर प्रक्रियेमुळे अभिषेक कळमकर याच्याभोवती अडचणी वाढल्या आहेत. गेल्या सव्वा महिन्यापासून अभिषेक कळमकर हा दाखल अत्याचाराच्या गुन्ह्यात फरार आहे.
माजी महापौर अभिषेक कळमकर याने विवाहित युवतीला नोकरीच्या अमिषाने तिच्यावर अत्याचार केल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. 21 फेब्रुवारीला हा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून अभिषेक कळमकर हा फरार झालेला आहे.नोकरीच्या अमिषाने अभिषेक कळमकर याने विवाहित युवतीचे शोषण करताना, व्हिडिओ काॅलद्वारे देखील त्रास दिला आहे. पीडितेने यासंदर्भातले व्हिडिओ देखील पोलिसांकडे सादर केलेत. शिरूर (जि. पुणे) इथं अत्याचार आणि नगर तालुक्यातील विळद घाटातील रस्त्यावर वाहनात शोषण केल्याचं पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे. हे प्रकार सहन न झाल्याने पीडित युवतीने पोलिसांकडे तक्रार दिली.
अभिषेक कळमकर याच्याविरोधात तोफखाना पोलिसांकडे देखील एक तक्रारी अर्ज आहे. अभिषेक कळमकर याला पकडण्यासाठी त्याच्या मागावर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसाचं पथक आहे. पारनेर तालुक्यात असल्याची माहितीवरून पथकाने कारवाई करत असताना, त्याने गुंगारा दिल्याचं देखील समोर आलं आहे. पारनेर पोलिस ठाण्यात रहदारीच्या रस्त्यावर तसा हलगर्जीपणाने वाहन चालवल्याचा, स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकातील कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.
याच दरम्यान, अभिषेक कळमकर याने जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. यानंतर आता न्यायायलाने अभिषेक कळमकराविरोधात स्टँडिंग वाॅरंटचा आदेश बजावला आहे. यामुळे फरार अभिषेक कळमकर याने स्वतः भोवती कायदेशीर अडचणी वाढवून घेतल्या आहेत.
स्टँडिंग वॉरंट म्हणजे न्यायालयाने फरार आरोपीविरुद्ध जारी केलेला एक कायमस्वरूपी अटक आदेश, जो आरोपी पकडला जाईपर्यंत किंवा न्यायालय तो रद्द करेपर्यंत वैध राहतो. हे वॉरंट सहसा आरोपी अनेक सुनावणींना अनुपस्थित राहिल्यास किंवा पोलिसांना सापडत नसल्यास, कलम 82 CrPC अंतर्गत ‘फरार घोषित’ करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून जारी केले जाते.


