Friday, February 20, 2026

नगरमध्ये महाविकास आघाडीची प्रचारात आघाडी ; प्रचार रॅलीत माजी महापौर कळमकर यांनी जनतेसमोर मांडला प्रश्‍नांचा पाढा

महाविकास आघाडीची प्रचारात आघाडी
प्रचार रॅलीत माजी महापौर कळमकर यांनी जनतेसमोर मांडला प्रश्‍नांचा पाढा
महाविकास आघाडीचे उमेदवार हे सत्ताधीश नव्हे, तर महापालिकेत जनतेचे सेवक म्हणून काम करणार -खा. निलेश लंके
अहिल्यानगर- अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतली असून, खासदार निलेश लंके स्वतः उमेदवारांच्या प्रचार रॅलीत सहभागी होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रभाग क्रमांक 7 मध्ये काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
प्रभाग क्रमांक 7 मधील महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उमेदवार महेश सखाराम शेळके (अ), तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे उमेदवार प्रतिभा अक्षय भगत (क) व योगेश बाबासाहेब सुडके (ड) यांच्या प्रचारार्थ बालिकाश्रम रोड व परिसरातील विविध भागांत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या प्रचार रॅलीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर यांच्या हस्ते गणपती मंदिरात नारळ वाढवून करण्यात आली. या रॅलीत उमेदवारांसह खासदार निलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष निलेश मालपाणी, माजी नगरसेवक संजय झिंजे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ढोल-ताशांच्या गजरात व जोशपूर्ण घोषणांमुळे संपूर्ण परिसर निवडणुकीच्या वातावरणाने दणाणून गेला. सुडके मळा, महावीर नगर, भिंगारदिवे मळा, बोरुडे मळा, भुतकरवाडी या भागांतून रॅली काढत उमेदवारांनी व नेत्यांनी नागरिकांच्या घरोघरी जाऊन गाठी-भेटी घेतल्या. खासदार निलेश लंके यांनी स्वतः मतदारांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी बोलताना माजी महापौर अभिषेक कळमकर म्हणाले, “बालिकाश्रम रोड येथील कवडे नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर खडी टाकून ठेवण्यात आली असून, त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. महापालिका व राज्यात सत्ता असतानाही पाच वर्षांत ही विकासकामे झाली नाहीत. निवडणुका जवळ आल्यावर विकासाचा दिखावा करून गाजावाजा केला जात आहे. नागरिकांनी भूलथापांना व खोट्या व्हिजनला बळी पडू नये. खऱ्या विकासासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना संधी द्यावी.”
खासदार निलेश लंके म्हणाले की, “शहराचा सर्वांगीण विकास महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच होणार आहे. सर्वसामान्य कुटुंबातील, जनतेच्या प्रश्‍नांची जाण असणारे उमेदवार आम्ही दिले आहेत. ही निवडणूक धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची आहे. जनशक्तीच्या विजयासाठी सर्वसामान्य जनता एकवटणार आहे. निवडून येणारे महाविकास आघाडीचे उमेदवार हे सत्ताधीश नव्हे, तर महापालिकेत जनतेचे सेवक म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles