राहुरी पाथर्डी नगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप महायुतीचा विजय निर्धार मेळावा उत्साहात संपन्न
मतदारसंघाच्या विकासासाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट – प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीला कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद
अहिल्यानगर : राहुरी विधानसभा पोटनिवडणूक स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या दुःखद निधनामुळे होत असून त्यांच्या चिरंजीव अक्षय कर्डिले यांना महायुतीच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे. तळागाळातील जनतेचे नेतृत्व करणारे स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी सर्वांना सोबत घेत विकासकामे मार्गी लावली. त्यांच्या कार्याचा वारसा अक्षय कर्डिले यांना लाभला असून ही निवडणूक वेगळी व महत्त्वाची आहे. तीन तालुके मिळून बनलेल्या या मतदारसंघात विविध प्रश्न असून कार्यकर्त्यांनी वाड्या-वस्तीवर जाऊन नागरिकांशी संवाद साधावा आणि अक्षय कर्डिले यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले.
राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप महायुतीच्या वतीने उमेदवार अक्षय कर्डिले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून विजय निर्धार मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतीताई गाडे, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ, आमदार सुरेश धस, आमदार काशिनाथ दाते, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, सुभाष पाटील, काशिनाथ लवांडे, अलकाताई कर्डिले आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिले यांना दिलेली उमेदवारी योग्य असून तिचे सार्थक करून दाखवू. भाजप स्थापना दिनाच्या दिवशी अर्ज दाखल होणे ही विशेष बाब आहे. तालुक्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे. मुळा धरणातील गाळ काढणे, वांबोरी चारी टप्पा दोन काम मार्गी लावणे तसेच केके रेंज भूसंपादनाचा प्रश्न रद्द केला आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा केली असून त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कार्यकर्त्यांनी महायुतीला तडा जाईल असे कोणतेही काम करू नये व अक्षय कर्डिले यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले की, स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले हे दातृत्व व नेतृत्व असलेले नेते होते. सरपंच ते आमदार, माजी मंत्री ते जिल्हा बँकेचे चेअरमन अशी विविध पदे त्यांनी भूषवली. त्यांनी जनसामान्यांच्या कामातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सकाळी सात वाजल्यापासून जनसेवेला सुरुवात करणारे ते नेते होते. अक्षय कर्डिले यांनी कमी वयातच प्रभावीपणे जनतेच्या प्रश्नांवर भूमिका मांडली असून त्यांच्या नेतृत्वात दूरदृष्टी दिसते. आधुनिक राजकारणात ते सक्षम नेतृत्व म्हणून पुढे येतील. त्यामुळे शिवाजीराव कर्डिले यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करून अक्षय कर्डिले यांना आमदार करावे, असे आवाहन त्यांनी केले.
महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले म्हणाले की, हा दिवस माझ्यासाठी भावनिक आहे. ज्यांची सर्वाधिक गरज होती ते माझे वडील आज आपल्यात नाहीत. त्यांनी आयुष्यभर जनतेच्या प्रश्नांसाठी अहोरात्र कष्ट केले. माझ्यासाठी त्यांनी जनतेचे प्रेम कमावून ठेवले आहे. आज त्यांच्या अनुपस्थितीत माझा राजकीय प्रवास सुरू होत आहे. आई नेहमी सोबत होती, पण वडील जनतेच्या कामात व्यस्त असल्याने अनेकदा भेट होत नसे. आजही त्यांच्या फोनची वाट पाहतो, पण तो येत नाही ही खंत मनात आहे. त्यांनी दिलेल्या संस्कारांप्रमाणेच जनतेच्या सुखदुःखात सहभागी होत प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करेन. जनतेने जसे प्रेम वडिलांवर केले तसेच प्रेम माझ्यावरही करावे, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
यावेळी विविध मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संपूर्ण परिसरात त्यांच्या नावाचा जयघोष घुमत होता


