अहिल्यानगर-नेवासा तालुक्यातील सोनई, करजगावसह 16 गावांसाठी मुळा धरणातून राबविण्यात आलेल्या पाणी योजनेच्या वीज कनेक्शन खंडित प्रकरणी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री शंकरराव गडाख यांना येथील जिल्हा न्यायालयात हजेरी लावावी लागली. गुरूवारी (7 ऑगस्ट) न्यायालयासमोर हजर राहिल्यानंतर न्यायाधीश जी. जी. सोनी यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर त्यांना वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.नेवासा तालुक्यातील पाणी योजना सुरळीत सुरू रहावी आणि गावागावात नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी गडाख यांनी सातत्याने पाठपुरावा करत अनेक आंदोलने केली आहेत. मात्र, काही काळापूर्वी योजनेचे थकीत वीज बिल न भरल्याने कोणतीही पूर्वसूचना न देता वीज वितरण कंपनीने वीज कनेक्शन तोडले होते. त्यामुळे सोनई, करजगावसह 16 गावांमध्ये गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली होती. या संकटामुळे नागरिक व जनावरांचे हाल सुरू झाले. या पार्श्वभूमीवर शंकरराव गडाख यांनी राहुरी-शनिशिंगणापूर राष्ट्रीय महामार्गावर हजारो ग्रामस्थ, महिला भगिनींसह भर उन्हात तीन तास हंडा मोर्चा व रास्तारोको आंदोलन करत प्रशासनाला पाणी योजना पुन्हा सुरू करण्यास भाग पाडले. मात्र, या आंदोलनामुळे गडाख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यात न्यायालयाने त्यांना समन्स बजावले होते. त्यानुसार गुरूवारी ते न्यायालयात हजर राहिले. यावेळी त्यांच्या वतीने अॅड. संजय दुशिंग व अॅड. संजय वाल्हेकर यांनी बाजू मांडली. प्रकरणाची पुढील सुनावणी ठरविण्यात आली असून, शंकरराव गडाख यांना न्यायालयाच्या खेटा वारंवार माराव्या लागू शकतात.


