अहिल्यानगर -माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या पोखर्डी (ता. अहिल्यानगर) शिवारातील शेतजमिनीच्या कंपाऊंडची भिंत तोडून आतमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करत ‘ताबा’ मारल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तीन ते चार अनोळखी महिलांंविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी नरेंद्र मारूतीराव घुले (वय 65 रा. दहिगाव-ने, ता. शेवगाव) यांनी फिर्याद दिली आहे. नरेंद्र घुले यांची पोखर्डी शिवारातील गट नंबर 180/2 मध्ये शेतजमीन आहे. गुरूवारी (16 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या जमिनीची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना ताबा मारल्याचा प्रकार लक्ष्यात आला. तीन ते चार अनोळखी महिलांनी त्यांच्या जागेच्या कंपाऊंडची भिंत फोडून आतमध्ये अनाधिकाराने प्रवेश केला होता. इतकेच नाही, तर या महिलांनी तेथे दोन पाल ठोकून राहण्यास सुरूवात केली होती.
दरम्यान, घुले यांचे कर्मचारी करण गुंजाळ व इतरांनी, त्या महिलांना जागा खाली करण्याबाबत हटकले. तेव्हा या अनोळखी महिलांनी वाद घालण्यास सुरूवात केली. शिवीगाळ करत दमदाटी केली. आम्हाला पैसे द्या, त्याशिवाय आम्ही येथून जाणार नाही, अशी थेट धमकी देत महिलांनी पैशांची मागणी केली. या संपूर्ण प्रकारानंतर नरेंद्र घुले यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून, पोलिसांनी तीन ते चार अनोळखी महिलांविरूध्द गुन्हा नोंदवला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.


