अहिल्यानगर : नगर ते कोपरगाव रस्त्यावरील वाढत्या अपघाताच्या निषेधार्थ आज, सोमवारी राहुरीमध्ये दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबातील सदस्य व सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत मुंडन आंदोलन केले. ठेकेदार कंपनी व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी या वेळी बोलताना दिला.
राहुरीमध्ये गेल्या १० दिवसांत नगर ते कोपरगाव या रस्त्यावर तिघांचा बळी गेला. या अपघातातील बळी पडलेल्या कुटुंबांतील सदस्य व सामाजिक कार्यकर्त्यांनी दशक्रिया विधीनंतर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला व मुंडन करण्याचे आंदोलन केले. या मोर्चासमोर बोलताना माजी आमदार तनपुरे म्हणाले, ‘रस्त्याच्या कामाकरता कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला, तो कोठे गेला? अनेक वर्षांपासून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आंदोलने करण्यात आली. त्यानंतरही अनेकांचा बळी गेला. अनेकांना अपंगत्व आले. मात्र संबंधितांवर जबाबदारी निश्चित केली जात नाही. आणखी किती बळी गेल्यावर राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे काम पूर्ण केले जाणार आहे?’
त्यामुळे येत्या सात दिवसांत गुन्हे दाखल करून ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांना अटक केली नाही, तर नगर-कोपरगाव रस्ता अडवून केंद्र व राज्य शासनाची लक्ष वेधावे लागेल. वारंवार मागणी करूनही रस्त्याचे काम हाती घेतले जात नाही. केवळ तात्पुरती डागडुजी केली जात आहे. दुरुस्तीनंतर लगेचच मोठे खड्डे पडतात. यातून अपघात घडत आहेत. बळी जात आहेत. खासदार नीलेश लंके यांनी उपोषण करून लक्ष वेधले, तरीही सरकार जागे झाले नाही. नागरिकांचा उद्रेक होईल, असा इशारा तनपुरे यांनी दिला. या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव, मुळा प्रवरा वीज संस्थेचे माजी संचालक आयुब पठाण, ज्ञानेश्वर जगधने, नीलेश जगधने, बाळासाहेब जाधव, विजय तमनर, ज्ञानेश्वर बाचकर, ज्ञानेश्वर राक्षे, सूर्यकांत वाकचौरे यांचे भाषण झाले.
राहुरीमध्ये गेल्या १० दिवसांत नगर ते कोपरगाव या रस्त्यावर तिघांचा बळी गेला. या अपघातातील बळी पडलेल्या कुटुंबांतील सदस्य व सामाजिक कार्यकर्त्यांनी दशक्रिया विधीनंतर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला व मुंडन करण्याचे आंदोलन केले.महामार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ, अपघातात बळी गेलेल्या कुटुंबातील सिद्धार्थ जगधने व दत्तात्रय जोगदंड यांनी मोर्चासमोर तहसील कार्यालयाच्या आवारात मुंडन करून निषेध नोंदवला. राहुरीतील अमरधाम येथे दशक्रिया विधी झाल्यानंतर मृतांच्या कुटुंबातील सदस्यांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत या प्रश्नाकडे लक्ष वेधले.