भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडला पक्ष प्रवेश सोहळा
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीवर भाजपने मोठा डाव टाकला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अजित पवार राष्ट्रवादीचे माजी आमदार, सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, मोहोळचे शिवसेना नेते नागनाथ क्षीरसागर, माढ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजीतसिंह शिंदे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
सातारा जिल्ह्यातील माण खटाव तालुक्यातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकारी, नेत्यांनी तसेच मराठवाड्यातील शिक्षक संघटनेच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे स्वागत केलं.
या कार्यक्रमात चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासासाठी आज या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रीयत्वाच्या भावनेने आज सर्वांनी प्रवेश केला आहे भाजपाच्या परिवारात सर्वांचे स्वागत असून एकदिलाने काम करत केंद्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी काम करायचे आहे’.
मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड शक्ती असलेल्या नेत्यांनी परिसराच्या विकासासाठी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्याचा विकास उंचीवर पोहोचत आहे. पक्ष ताकदीने सर्वांच्या पाठीशी उभा राहील आणि प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल’.
राजन पाटील म्हणाले की, मोहोळ तालुक्याचा स्वाभिमान गहाण ठेवला जाऊ नये यासाठी आम्ही भाजपामध्ये प्रवेश करत आहोत. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे नेतृत्व अधिकाधीक सक्षम होण्यासाठी रात्रीचा दिवस करून काम करू’.
रणजीतसिंह शिंदे म्हणाले की, आगामी निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी झोकून देऊन काम करायचे आहे. विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी सर्वांच्या साथीने काम करू असेही ते म्हणाले. रणजीतसिंह शिंदे यांचे बंधू पंचायत समिती माजी सभापती विक्रम शिंदे, जि.प. माजी सभापती शिवाजी कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास तोडकर, रमेश पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य शिवाजी पाटील, तुकाराम ढवळे, शंभुराजे मोरे आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला.
मोहोळ तालुक्यातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे माजी प्रदेश अध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, मोहोळचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, दीपक माळी, सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष अस्लम चौधरी, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भारत सुतकर, मोहोळ कृ.उ.बा.स. सभापती धनाजी गावडे, कृ.उ.बा.स.चे उपसभापती प्रशांत बचुटे, जि. प. माजी सभापती जालिंदर भाऊ लांडे आदींचा समावेश आहे.खटाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष नंदकुमार मोरे, पंचायत समितीचे माजी सभापती बळवंतराव माने, माजी सदस्य मोहनराव बुधे, पं. स.माजी उपसभापती हिराचंद पवार आदींचा समावेश आहे. तसेच माण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष बाळासाहेब सावंत यांनी भाजपा प्रवेश केला.
वडूज नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष सुनिल गोडसे, माजी उपनगराध्यक्ष मनोज कुंभार, मार्केट कमिटीचे माजी संचालक काकासाहेब मोटे, दहिवडी नगरपंचायतचे नगरसेवक महेश जाधव, दत्तात्रेय अवघडे, नगरसेविका मोनिका गुंडगे, निमसोड ग्रामपंचायतचे सरपंच सुनील मोटे यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला.


