श्रीराम नवमीनिमित्तशिर्डीत राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान ताब्यात घेतलेल्या भिक्षेकरूंपैकी चारजणांचा नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणेच्या कार्यपध्दतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असून उपचारांतील संभाव्य हलगर्जीपणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांच्या आदेशानुसार चौकशी समिती स्थापन केली आहे. दरम्यान, मयत झालेले सर्वजण भिक्षेकरू हे अल्कोहोल रिव्हर्स सिंड्रोमने पीडित होते. त्यांची दारू अचानक बंद झाल्याने त्यांच्यावर मानसिक व शारिरिक परिणाम होऊन त्यात ते अत्यवस्थ होऊन त्यांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दोन दिवसांपूर्वी विसापूर(ता. श्रीगोंदा) येथील भिक्षेकरी गृहातील अत्यावस्थ दहाजणांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेत असलेल्या भिक्षेकरूंपैकी अशोक मन्साराम बोरसे (वय 35), सारंधर मधुकर वाघमारे (वय 48), प्रवीण अण्णा घोरपडे (वय 48) आणि इस्सार अब्दुल शेख (वय 38) यांचा मृत्यू झाला. यातील एकाचा मृत्यू सोमवार, 7 एप्रिल रोजी झाला असून उर्वरित तिघांनी मंगळवार, 8 एप्रिल रोजी प्राण सोडले. सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन आज, बुधवारी करण्यात येणार असून, त्यातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी पोलीस नगरपरिषद आणि साई संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील भीक मागणार्यांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली.
या मोहिमेत 50 हून अधिक भिक्षेकरूंना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना विसापूर (ता. श्रीगोंदा) येथील भिक्षेकरी गृहात ठेवण्यात आले होते. मात्र, तेथे असताना 10 भिक्षेकरूंची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रूग्णालयात हलवण्यात आले होते. उपचार सुरू असताना चारजणांचा मृत्यू झाल्याने रूग्णालय प्रशासनावर उपचारातील दुर्लक्षाचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे, उपचार घेत असलेल्या भिक्षेकरूंपैकी चौघेजण रूग्णालयातून पलायन करण्यात यशस्वी झाले असून, उर्वरित दोन रूग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, चौकशी समितीचा अहवाल सार्वजनिक झाल्यानंतरच या प्रकरणातील सत्य परिस्थिती उघड होईल.


