Friday, November 7, 2025

समाजासाठी प्रेरणादायी…..तरुणाच्या अवयवदानातून चार रुग्णांना नवजीवन

राहाता: रस्ते अपघातात गंभीर जखमी अवस्थेतील तरुणाला उपचारासाठी लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान आज, गुरुवारी पहाटे त्याचा मेंदू मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तरकसे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही त्यांनी सामाजिक भान ठेवून तरुणाच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. दिवंगत कैलासची शस्त्रक्रिया करून दोन्ही किडनी आणि डोळे अवयवदान करण्यात आले.

शेतकरी असलेल्या कैलासच्या मृत्यूनंतर त्याच्या अवयवदानातून चार जणांचे जीवन सुखकर होणार आहे. तालुक्यातील तरकसवाडी येथील युवक कैलास अशोक तरकसे (वय ३५) हे रस्ता अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात २६ मे रोजी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज पहाटेच्या सुमारास त्यांचा मेंदू मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. या दु:खद प्रसंगी त्यांच्या आई-वडील आणि बहिणीने अत्यंत धैर्याने आणि समाजहिताच्या भावनेने अवयवदानाचा निर्णय घेतला, जो इतरांसाठी प्रेरणादायी ठरला.

रुग्णालयातील अवयव प्रत्यारोपण समन्वयकांनी कुटुंबीयांना समुपदेशन करून प्रक्रिया समजावून सांगितली. याबाबतची संबंधित माहिती ‘झेडटीटीसी’ (पुणे) यांच्याकडे पाठवण्यात आली. त्यानंतर पुण्यातील जुपिटर रुग्णालयात येथून आलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने, प्रवरा रुग्णालयातील मेंदू मृत समिती, प्रशासन, कैलास यांचे आई-वडील, बहीण तसेच इतर नातेवाईकांच्या सहकार्याने आज सकाळी अवयवदानाची प्रक्रिया पार पाडली.

या महत्त्वपूर्ण व भावनिक प्रक्रियेमुळे चार रुग्णांना नवजीवन प्राप्त झाले. मृत कैलास तरकसे यांचे अवयवदान करण्याचा त्यांच्या कुटुंबीयांनी घेतलेला उदात्त निर्णय समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरला. तरकसवाडीसारख्या ग्रामीण भागातील या कुटुंबाच्या धाडसाला आणि मानवतेच्या सेवेसाठी घेतलेल्या निर्णयाचे अभिनंदन होत आहे. कैलास यांच्या दोन किडनी आणि दोन्ही डोळे गरजूंना मिळाले आहेत. त्यातून चार जणांना नवजीवन मिळणार आहेच शिवाय नेत्रदान केल्याने मृत्यूनंतरही कैलास हे जग पाहू शकणार आहे.

तरुण मुलाचा मृत्यू झाल्यानंतरही तरकसे कुटुंबाने जपलेली सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद असून, समाजासाठी प्रेरणादायी आहे.कैलास यांच्या पार्थिवावर दुपारी अस्तगाव येथील अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कैलास यांच्या पाठीमागे आई, वडील, दोन बहिणी व एक भाऊ असा परिवार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles