नगर: माझ्याकडे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा, मी टे्रडिंग करून तुम्हाला दर महिन्याला 10 टक्के परतावा देतो, असे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना तब्बल 48 लाखांचा चुना लावल्याच्या गुन्ह्यात शेवगाव येथील तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर अंगरखे (रा विद्यानगर, शेवगाव) असे त्याचे नाव असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत एक फिर्यादी प्रीतम शामुवेल आढाव (वय 36, रा. पैठण रोड, शेवगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीचा आशय असा ः त्यांची 6 वर्षांपासून सागर अंगरखे (रा विद्यानगर, शेवगाव) याच्याशी ओळख होती. ‘शेवगाव येथे आपले डेविड कॅफे ट्रेडिंग या नावाने ऑफिस असून, मी शेअर मार्कटिंग करतो. माझ्याकडे पैसे गुंतवणार्यांना मी महिन्याला 10 टक्के परतावा देतो’ असे त्याने सांगितले. त्यामुळे आढाव यांनी डेविड कॅफे ट्रेडिंग या ऑफिसमध्ये जाऊन 16 लाख रुपये रोख जमा केले. त्या बदल्यात अंगरखे याने त्यांना 10 लाख व 5 लाख रुपयांची नोटरी करून दिली आणि एचडीएफसी बँकेचे दोन चेक दिले. गुंतवणुकीच्या बदल्यात परतावा म्हणून सागर अंगरखे याने 4 लाख 89 हजार रुपये प्रीतम यांना हप्त्याद्वारे दिले होते. मात्र, त्यानंतर त्याने परतावा देण्यास टाळाटाळ केली.
यातून 11 लाख 11 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समजले. याशिवाय याच प्रकारे अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून आणखी काही लोकांची फसवणूकत्याने केली आहे. त्यात संतोष पेत्रस कोल्हे यांची 3.20 लाख, सुधीर शिवाजी उजागरे 9 लाख, रावसाहेब विठ्ठल घुले 2 लाख, अमोल अरुण बनसोडे 6.70 लाख, अजित शब्बीर शेख 10 लाख, सुभम विष्णुपंत दहिवाळकर यांची दीड लाख अशी एकूण 48 लाख 40 हजार 200 रुपयांची फसवणूक सागर अंगरखे याने केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शेवगाव पोलिसांनी सागर अंगरखे याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याला न्यायालयाने 12 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.