दिवाळी सणाच्या काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवा अन्यथा महावितरणला टाळे ठोकू : शहर प्रमुख किरण काळे
प्रतिनिधी : ऐन दिवाळी सणाच्या काळात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. बाजारपेठेत व्यापारांना, सर्वसामान्य नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. तात्काळ विजेचा अखंड, पूर्ण दाबाने पुरवठा राहील याबाबत तातडीने योग्य ती कार्यवाही करा. ऑक्टोबर अखेरपर्यंत भारनियमन करू नका. अन्यथा महावितरण कार्यालयास शिवसेना स्टाईल टाळे ठोकावे लागेल, असा इशारा शहर ठाकरे शिवसेनेने दिला आहे.
शहर प्रमुख किरण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने समक्ष भेट घेत निवेदन दिले. यावेळी अधिकाऱ्यांना शिष्टमंडळाने चांगलेच धारेवर धरले. कामगार सेनेचे विलास उबाळे, उपजिल्हाप्रमुख रावजी नांगरे, कामगार सेनेचे शहर प्रमुख गौरव ढोणे, उपशहर प्रमुख सुनील भोसले, केडगाव शिवसेनेचे प्रतीक बारसे, सामाजिक न्याय सेनेचे विकास भिंगारदिवे आदींसह शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, वर्षभरातील महत्त्वाच्या सणां पैकी दिवाळीचा सण येऊ घातला आहे. सण साजरा करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू आहे. बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. दिवाळीचे फराळ, मिठाई यांनाही या काळात मोठी मागणी आहे. लोकांची घरांची साफसफाई सुरू आहे.मात्र नागरिकांच्या महावितरणच्या कारभाराबद्दल तक्रारी येत आहेत. जिल्हाभरातून शहरातील पारंपरिक असणाऱ्या बाजारपेठेमध्ये मोठ्या संख्येने ग्राहक येत असतात. मात्र दिवसभरात अनेक वेळा, तसेच रात्री देखील वीज पुरवठा खंडित होत आहे. विजेचा दाब कमी असल्यामुळे सर्व उपकरणे चालत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, ग्राहक यांची प्रचंड गैरसोय होत आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे, देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली दर शनिवारी भार नियमन महावितरण कडून केले जाते. सणासुदीच्या काळात ते करू नये त्यासाठी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मागील आठवड्यात महावितरणला निवेदन दिले होते. या कालावधीत भारनियमन न करण्याचे आश्वासन देखील दिले होते. मात्र दिलेले आश्वासन धादांत खोटे निघाले आहे. यामुळे व्यापारी, नागरिक त्रस्त आहेत.
किरण काळे म्हणाले, काही दिवसांपूर्वी शहर लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांनी महावितरणकडे या बाबत मागणी केली होती. पण प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा वचक राहिलेला नाही. त्यांचे कोणी ऐकत नाही. राज्य आणि केंद्रात तथाकथित हिंदुत्ववादी सरकार असून देखील हिंदू खतरें मे असल्यामुळे धर्म रक्षण कार्यामध्ये ते प्रचंड व्यस्त आहेत. त्यांना राज्यभर भ्रमंती करावी लागते. त्यामुळे आता त्यांना शहरातील व्यापारी, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांचे काही देणे घेणे उरलेले नाही. पण ते विसरत आहेत की त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे हिंदूंच्या दिवाळी सणाच्या काळात हिंदू व्यापारी आणि ग्राहक प्रचंड अडचणींचा सामना करत आहेत. महावितरणने तात्काळ त्रुटी दूर कराव्यात. अन्यथा शिवसेना आंदोलन छेडेल, असा इशारा काळे यांनी दिला आहे.


