अळकुटी ते म्हस्केवाडी रस्त्यासाठी यापूर्वीच २ कोटी रुपये मंजूर :- सुजित झावरे पाटील
म्हस्केवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार
म्हस्केवाडी (ता. पारनेर) येथील प्रसिद्ध श्रीगणेश मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या प्रसंगी गावकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी म्हस्केवाडी परिसरातील विकासकामांबाबत महत्वपूर्ण घोषणा केल्या.
सुजित झावरे पाटील म्हणाले, “अळकुटी ते म्हस्केवाडी या प्रमुख रस्त्यासाठी यापूर्वीच दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, सध्या हे काम निविदा प्रक्रियेत आहे. अतिशय लवकरच ठेकेदार निश्चित होईल आणि रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू होईल.”
म्हस्केवाडी गावाचा विकास हा झावरे पाटील कुटुंबाशी घट्टपणे जोडलेला आहे. याबाबत बोलताना सुजित झावरे पाटील म्हणाले, “स्वर्गीय आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या काळात सभामंडप, सीडीवर्क, रस्ते, बंधारे यांसारखी अनेक महत्वाची कामे गावात झाली. त्याच परंपरेत मी जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना ग्रामसचिवालयाची सुविधा देखील म्हस्केवाडीला देण्यात आली. पुढेही या गावाच्या प्रगतीसाठी माझा पूर्ण प्रयत्न राहील.”
ते पुढे म्हणाले, “म्हस्केवाडी गावासाठी अजूनही काही विकासकामांची गरज आहे. मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण, अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा व इतर सुविधा यासारख्या पायाभूत विकासकामांबरोबर इतरही आवश्यक निधी विविध योजनांमधून उपलब्ध करून दिला जाईल.”
या कार्यक्रमास बाजार समितीचे माजी सभापती अरुणराव ठाणगे, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते


