शेवगाव गणेश विसर्जन मिरवणूक प्रकरणी ध्वनी प्रदूषणाविरोधात तब्बल सहा गुन्हे दाखल
शेवगाव (प्रतिनिधी):
शेवगाव शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी डीजे वाजवून कर्णकर्कश आवाज निर्माण करून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. मंगळवार, दि. 4 सप्टेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या विसर्जन मिरवणुकीत विविध मंडळांनी स्पर्धा लागल्याप्रमाणे डीजे लावून गोंधळ उडवला. यामुळे रुग्णालय परिसर, तहसीलदारांचे निवासस्थान आणि अन्य संवेदनशील भागात नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा. लागला
पोलिसांनी कारवाई करत तब्बल सहा स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. हे सर्व गुन्हे भारतीय न्याय संहिता 2023 कलम 223, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 3, 15 व ध्वनी प्रदूषण प्रतिबंध अधिनियम 2000 चे कलम 3, 4, 5, 6 अंतर्गत नोंदविण्यात आले आहेत.
गुन्ह्यात विविध मंडळांचे अध्यक्ष व जबाबदार व्यक्तींसह डीजे वाहने मालकांचा समावेश आहे. त्यात कृष्णा धनवडे गोविंद लांडे ऋषिकेश वाघोले प्रवीण भारस्कर आकाश वखरे, संतोष जाधव आदींवर गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलिसांची कारवाई
या प्रकरणी गुन्हे नोंदविण्याचे काम पो.ना. बी.पी. गायकवाड यांनी केले असून तपास PSI विशाल लहाने, PSI आजिनाथ कोठाळे, PSI प्रवीण महाले, PSI रामहरी खेडकर, PSI बाजीराव सानप व सपोनी अशोक काटे आदी अधिकारी करत आहेत. सर्व गुन्ह्यांचे प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे हे कार्यरत आहेत.
पोलिसांचे आवाहन
गणेशोत्सव हा आनंदाचा सोहळा असून परंतु कायदा व सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादा पाळणे बंधनकारक आहे. नागरिकांनी धार्मिक कार्यक्रमात शिस्त राखून सहभाग घ्यावा, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा शेवगाव पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दिला


