अहिल्यानगर-शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून जेरबंद केले. या कारवाईत चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून दोघे पसार झाले आहेत. चौघांच्या ताब्यातून तब्बल सहा लाख 56 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील दरोडा, घरफोडी व रोड रॉबरी गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नियमित गस्त व विशेष कारवायांचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरीष भोये, उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, अंमलदार सुनील पवार, गणेश धोत्रे, शाहिद शेख, सुरेश माळी, आकाश काळे, भगवान धुळे, अर्जुन बडे, अरविंद भिंगारदिवे, शिवाजी कावडे यांच्या पथक गस्त घालत असताना शनिवारी (21 फेब्रुवारी) निरीक्षक कबाडी यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मध्यप्रदेश राज्यातील एक टोळी विनानंबरच्या पांढर्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनातून आगडगावकडून बुर्हानगरकडे येत असून शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत आहे.मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने बुर्हानगर-आगडगाव रस्त्यावर सापळा रचला. दरम्यान, संशयित स्कॉर्पिओ दिसताच पोलिसांनी वाहन अडविले. त्याचवेळी सहा इसमांनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून चार जणांना ताब्यात घेतले, तर दोघे पसार झाले. सादिकखान इसाकखान (वय 37), देवसिंग बाबुलाल भिलालाल (वय 24, दोघे, रा. मध्यप्रदेश), दानिश सादिक शेख (वय 24), दानिश अजीज शेख (वय 24, दोघे रा. कापुरवाडी, ता. अहिल्यानगर) अशी ताब्यात घेतल्यांची नावे आहेत. तर, राजाराम फुलेरिया व राजेश परमार (दोघे रा. मध्यप्रदेश) पसार झाले आहेत.
गावठी कट्ट्यासह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त
ताब्यात घेतलेल्या चौघांची पोलिसांनी अंगझडती व वाहन तपासणी केली असता सादिकखान याच्याकडून एक गावठी कट्टा व जिवंत काडतूस मिळून आले. तसेच धारदार कुकरी, लोखंडी कटावणी, टॉमी, पान्हा, बॅटरी, मिरची पावडर, बांगडी पाईप, पाच मोबाईल फोन, 805 लिटर डिझेल आणि विनानंबरची स्कॉर्पिओ असा एकूण सहा लाख 56 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


