करंजी घाटामध्ये वाहने अडवुन लुटमार करणारी टोळी जेरबंद, 7,90,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांची कारवाई.
प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, फिर्यादी श्री शिवाजी बाळासाहेब पाटेकर वय 32 वर्षे, रा. ढोरजळगांव, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर हे दिनांक 16/10/2025 रोजी पहाटे 05.45 वा. चे सुमारास त्यांचेकडील कारमधुन जात असतांना करंजी घाटामध्ये काळ्या रंगाच्या कारमधील आरोपींनी फिर्यादीची कार अडवुन फिर्यादीचे गळ्यातील सोन्याचे चैन व चालकाचे खिशातील 9500/- रुपये रोख रक्कम असा एकुण 74,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीने घेवुन गेलेले आहेत. सदर घटनेबाबत पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. 1172/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309 (4), 324 (2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर श्री किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/हरिष भोये, पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, सुरेश माळी, दिपक घाटकर, फुरकान शेख, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, रमिझराजा आतार, मनोज साखेर, भगवान धुळे यांचे पथक तयार करुन सदर पथकाने घटनाठिकाणी भेट देवुन पाहणी केली. तसेच जिल्ह्यामध्ये व आजुबाजुचे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपींची माहिती संकलित करुन तपास करत असतांना दिनांक 28/10/2025 रोजी पथकास व्यवसायीक कौशल्य व गुप्त बातमीदाराचे आधारे सदरचा गुन्हा हा संकेत चिंधु पडवळ रा. कुरकुंडी ता. खेड, जि. पुणे याने व त्याचे इतर साथीदारांनी केला असुन ते कडुस फाटा, खेड, जि. पुणे या ठिकाणी येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने तात्काळ कडुस फाटा या ठिकाणी जावुन सापळा रचुन 1) संकेत चिंधु पडवळ वय-25 वर्षे रा. कुरकुंडी ता. खेड, जि.पुणे, 2) नामदेव बाळासाहेब भोकसे वय – 28 वर्षे रा. कुरकुंडी ता. खेड जि. पुणे, यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांनी त्यांचा साथीदार 3) जगदीश सुरेश शिवेकर रा.करंजविहिरे ता. खेड जि.पुणे (फरार), याचेसोबत नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
ताब्यातील आरोपींकडुन गुन्ह्याचे वेळी वापरलेली 1) 7,00,000/- रुपये किमतीची हुंदाई कंपनीची व्हेरना कार, 90,000/- रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकुण 7,90,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ताब्यातील आरोपींना पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. 1172/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309 (4), 324 (2), 3(5) प्रमाणे गुन्ह्याचे तपासकामी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


