नगर पुणे महामार्गावर चास शिवारात कोयत्यांचा धाक दाखवत कारचालकाला बेदम मारहाण करून जबरी चोरी करणार्या टोळीतील तीन आरोपींना नगर तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद केले असून एक आरोपी अद्याप फरार आहे.
सविस्तर असे की, दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे ४.३० वाजता कोथरुळ (ता. माजलगाव, जि. बीड) येथील बालासाहेब काशीनाथ कदम व त्यांचा साथीदार पंकज श्रीराम कदम हे स्विफ्ट कार (एमएच १२ युएम २२४८) ने पुण्याकडे निघाले होते. कामरगाव शिवारातील हॉटेलजवळ शौचासाठी गाडी थांबवली असता, चार अनोळखी इसमांनी हातात कोयते घेऊन दोघांच्या गळ्याला शस्त्र लावले.
फिर्यादीस लाथाबुक्यांनी मारहाण करून त्यांना जबरदस्तीने त्यांच्या गाडीत बसवून नगरकडे नेत असताना स्विफ्ट कारचा लझरी वाहनाशी अपघात झाला. या गोंधळाचा फायदा घेत आरोपींनी १८ हजार रुपये रोख, ५० हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर, सुमारे ४७ हजार रुपये किमतीचा मोबाईल व इतर साहित्य असा एकूण १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला.
या प्रकरणी दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक तपास करण्यात आला.
तपासादरम्यान आरोपींना दैठणे गुंजाळ (ता. पारनेर) येथून अटक करण्यात आली. आरोपीमध्ये तुषार विजय उमाप, बुद्धभूषण संतोष आंग्रे (दोघे राहणार, दैठणे गुंजाळ, ता. पारनेर) तेजस लक्ष्मण उगलमुगले (रा. मनोरमा कॉलनी, नवनागापूर, अहिल्यानगर) तर चौथा आरोपी भो-या उर्फ विठ्ठल नवनाथ काळे (रा. गांधीनगर, अहिल्यानगर) हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. आरोपींकडून ८९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये ५,००० रुपये रोख, ५०,००० रुपये ऑनलाईन ट्रान्सफर, ३२,००० रुपये किंमतीचा वनप्लस मोबाईल चार्जर व जर्कीन, गुन्ह्यात वापरलेले लोखंडी कत्ती व कोयता जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, सहाय्यक फोजदार दत्तात्रय हिंगडे, पोहेकॉ नितीन शिंदे, सुभाष थोरात, मंगेश खरमाळे, विक्रांत भालसिंग, नितीन शिंदे यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.


