सोनार दुकानामध्ये हातचलाखीने दागिने चोरी करणारे महिलांची टोळी 49,875/- रुपये किमतीच्या दागिण्यांसह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांची कारवाई.
प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, फिर्यादी श्री हरिओम बापु मैड वय 20 वर्षे, रा. गदादेनगर, कर्जत, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर हे त्यांचे साई ज्वेलर्स दुकानामध्ये असतांना दोन अनोळखी महिलांनी दागिने खरेदी करण्याचे उद्देशाने येवुन दागिने पाहत असतांना हातचलाखीने फिर्यादीचे दुकानातील 38,095/- रुपये किमतीचे विविध वर्णनाचे चांदीचे दागिने चोरुन नेले आहेत. सदर घटनेबाबत कर्जत पोलीस ठाणे गु.र.नं. 579/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिपावली सणाचे वेळी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गर्दीचा फायदा घेवुन प्रवाशांचे दागिने चोरीचे घटनांमध्ये तसेच सराफ व्यवसायीकांचे दुकानामध्ये चोरीच्या घटना घडलेल्या असल्याने श्री किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार ऱ्हदय घोडके, भिमराज खर्से, शामसुंदर जाधव, योगेश कर्डीले, महादेव भांड महिला पोलीस अंमलदार चिमा काळे यांचे पथक तयार करुन सदर पथकास गुन्हे उघडकीस आणणेकरीता सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले होते.
दिनांक 28/10/2025 रोजी सदरचे पथक हे जामखेड परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेवुन चोरी करणारे तसेच सराफ व्यवसायीकांचे दुकानामध्ये दागिण्यांची चोरी करणारे महिला आरोपींची माहिती काढत असतांना पथकास बीड जिल्ह्यामधुन काही महिला जामखेड परिसरामध्ये येवुन सराफ व्यवसायीकांचे लक्ष विचलित करुन दागिने चोरी करत असुन त्यातील दोन महिला या पुन्हा चोरी करण्यासाठी जामखेड बस स्टँड परिसरामध्ये आलेल्या असल्याची माहिती मिळाली. पथकाने तात्काळ जामखेड बस स्टँड परिसरामध्ये जावुन खात्री करता दोन संशयीत महिला दिसुन आल्या. सदर महिलांना महिला पोलीस अंमलदार यांचे मार्फतीने ताब्यात घेवुन त्यांना त्यांची नावे गांव विचारता त्यांनी त्यांची नावे. 1) शांताबाई राधाकिसन जाधव वय 55 वर्षे, रा. हिवरसिंगा, ता. शिरुर, बीड, 2) निलावती लक्ष्मण केंगार वय 52 वर्षे, रा. मुर्शदपुर, ता. जि. बीड असे असल्याचे सांगितले. सदर महिलांचे ताब्यातुन 49,875/- रुपये किमतीचे विविध वर्णनाचे चांदीचे दागिने हस्तगत करुन वरील गुन्हा उघडकीस आणला आहे.
ताब्यातील महिला आरोपींना कर्जत पोलीस ठाणे गु.र.नं. 579/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303 (2) प्रमाणे गुन्ह्याचे तपासकामी कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


