अहिल्यानगर : प्रतिनिधी
माळशेज घाट–कल्याण (२४६ किमी) हा अत्यंत महत्त्वाचा नवीन रेल्वे मार्ग महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नाशिक या तीन प्रमुख विभागांना थेट जोडणारा ठरणार असून, राज्याच्या औद्योगिक व भौगोलिक विकासाला नवी दिशा देणारा ठरू शकतो. या प्रकल्पाला तात्काळ अंतिम मंजूरी व आर्थिक तरतूद करावी, अशी ठाम मागणी खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प प्रलंबित असल्याने प्रस्तावित लॉजिस्टिक्स कॉरिडॉरला मोठा फटका बसत आहे. सध्या मुंबई–नाशिक–मनमाड आणि पुणे–दौंड–अहिल्यानगर या मार्गांवर प्रचंड भार पडला असून, यामुळे मालवाहतूक खर्च वाढत आहे. परिणामी, उद्योगधंदे व गुंतवणूकदारांवरही प्रतिकूल परिणाम होत असल्याचे लंके यांनी पत्रात नमूद केले आहे.
मुंबई महानगर प्रदेश ते अहिल्यानगर–मराठवाडा– विदर्भ या भागांना जोडणारा सक्षम पर्यायी रेल्वे मार्ग सध्या उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत अहिल्यानगर–माळशेज घाट–कल्याण हा मार्ग भारतीय रेल्वेसाठी तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य, आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून उपयुक्त असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.
ना या रेल्वे मार्गामुळे छत्रपती संभाजीनगर–अहिल्यानगर–मुंबई–मराठवाडा–विदर्भ या पट्ट्यात वाहतूक सुलभ होईल.दिल्ली–मुंबई औद्योगिक कॉरिडॉरसाठी पूरक रेल्वे मार्ग उपलब्ध होईल. बंदरांशी निगडित मालवाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल. कृषी, निर्यात, एमएसएमई, पर्यटन आणि औद्योगिक क्षेत्राला चालना मिळेल. अहिल्यानगर–कल्याण तसेच कोकण प्रदेशाशी संपर्क अधिक गतिमान होईल.
या प्रकल्पासाठी आवश्यक सर्वेक्षण, व्यवहार्यता अभ्यास व तांत्रिक चाचण्या मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्या आहेत. मात्र, अंतिम प्रशासकीय मंजूरी आणि निधी वाटपाचा टप्पा अद्याप प्रलंबित आहे. महाराष्ट्र सरकार, उद्योग विभाग, एमआयडीसी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनीही सातत्याने या प्रकल्पाच्या जलद अंमलबजावणीची मागणी केली आहे. लंके यांनी २०२४ च्या संसद अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित केला होता.
राज्य व देशाच्या सर्वांगीण विकासासाठी हा प्रकल्प अत्यावश्यक असून, केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा खासदार लंके यांनी व्यक्त केली आहे. हा मार्ग मंजूर झाल्यास अहिल्यानगरसह संपूर्ण मध्य महाराष्ट्राच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
रेल्वे मंत्र्यांकडे पाच ठोस मागण्या
खासदार नीलेश लंके यांनी मंत्र्यांकडे केलेल्या मागण्यांमध्ये अहिल्यानगर–माळशेज घाट–कल्याण या नवीन रेल्वे मार्गाला तात्काळ अंतिम मंजुरी द्यावी, २०२५–२६ या आर्थिक वर्षात निधी वाटपाचा पहिला टप्पा त्वरित जाहीर करावा,
माळशेज घाट बोगदा प्रकल्पाच्या डीपीआरला तांत्रिक समितीची मंजूरी देऊन अंतिम मान्यता द्यावी, या मार्गाचा ‘विशेष रेल्वे प्रकल्प श्रेणी’मध्ये समावेश करावा. यांचा समावेश आहे.


