अहिल्यानगर : दागिने बनविण्यासाठी सराफ दुकानात कामाला असलेल्या कारागिरांनी सराफांचे तब्बल १ कोटीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार सराफ बाजारात घडला. याप्रकरणी सहा कारागिरांविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. कृष्णा जगदीश देडगावकर (३२) यांनी फिर्याद दिली. त्यांचे सराफ बाजारात जगदीश लक्ष्मण देडगावकर नावाने तसेच त्यांचा भाऊ प्रतीक याचे ए. जे. देडगावकर नावाने ज्वेलर्सचे दुकान आहे. या दुकानाच्या तळ मजल्यावर सोन्याचे दागिने बनवणारे कारागीर दीपनकर माजी, सोमीन बेरा (कार्तिक), सत्तु बेरा, स्नेहा बेरा हे काम करत होते. तसेच सोमनाथ सामंता व अन्मेश दुलाई हे दोन कारागीर त्यांच्या दुकानासमोरील विजय जगदाळे याच्या सराफ दुकानात कारागीर म्हणून काम करत होते. हे सोनार त्यांना सोने देऊन त्यांच्याकडून सोन्याचे दागिने बनवून घेत होते.
दि. २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी देडगावकर हे दुकानाच्या तळ मजल्यावर गेले असता त्यांना संबंधित कारागीर तेथे आढळले नाहीत. त्यांनी फोन करून संपर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. काही वेळाने जगदाळे यांना फोन करून त्यांच्या दुकानातील कारागीर आहेत का, याची खात्री केली; परंतु तेही फरार होते. त्यावरून संबंधित कारागीर सोन्याचे दागिने घेऊन पसार झाल्याचे लक्षात आल्याने देडगावकर यांनी दीपनकर माजी, सोमीन बेरा कार्तिक, सोमनाथ सामंता, आन्मेश दुलोई, सत्तू बेरा, स्नेहा बेरा यांच्या विरोधात सोने चोरून नेल्याची फिर्याद दिली.
१) २७.७५ लाखांचे कृष्णा देडगावकर यांचे २६५ ग्रॅम चोख सोने व दुरुस्तीसाठी दिलेले त्यांच्या पत्नीचे २९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, बांगड्या व पेशवाई हार.
२) ३२.५० लाखांचे विजय राजाराम जगदाळे यांचे ६५० ग्रॅम चोख सोने
३) ४.६५ लाखांचे सागर संजय गुरव यांचे ९३ ग्रॅम वजनाचा दुरुस्तीसाठी दिलेला सोन्याचा नेकलेस
४) १३ लाखांचे प्रतीक जगदीश देडगावकर यांचे ८० ग्रॅम वजनाचे दुरुस्तीसाठी दिलेले कानातले व नेकलेस, तसेच १८० ग्रॅम चोख सोने.
५) ८५ हजारांची भरत दगडूशेठ शिराळकर यांचे १७ ग्रॅम वजनाची लगड.
६) ७ लाखांचे बरजहान सुलेमान शेख याचे १४० ग्रॅम वजनाचे चोख सोने व दागिने.
७) १४.२५ लाखांचे प्रमोद आबासाहेब गाडगे यांचे २८५ ग्रॅम वजनाचे चोख सोने.
८) १.०५ लाखांचे इम्रान आशरफ आली यांचे २१ ग्रॅम वजनाचे चोख सोने.
असे एकूण १ कोटी १ लाख ५ हजार रुपये किमतीचे २ हजार २१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चोख व लगड चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


