तारकपूर बस स्थानक येथून २० लाख रुपये किमतीच्या सोन्याची चोरी
आमदार संग्राम जगताप यांचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन, चोरट्यांचा बंदोबस्त करा
अहिल्यानगर : बोल्हेगाव येथील रहिवासी सुहासिनी अडोळे या सोलापूर येथून एसटी बसने प्रवास करीत माळीवाडा बसस्थानकापर्यंत आल्या असता सोन्याचे दागिने ठेवलेली पिशवी त्यांच्यासोबत होती मात्र बस माळीवाडा बसस्थानकातून तारकपूर येथे आल्यावर एक अनोळखी महिलेने जागा मिळवण्याच्या बहाण्याने त्या सोन्याचे दागिने ठेवलेल्या पिशवीची चोरी केली, त्यामध्ये सुमारे २० लाख रुपये किमतीचे सोने होते, सध्या सणासुदीचे दिवस सुरू असून दिवाळी सणाच्या खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात बाजारात येत असतात, यामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढणार असून गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवावा, नागरिकांच्या सुरक्षेतेची काळजी घेण्याची जबाबदारी ही पोलिसांची असून चोरांचा बंदोबस्त करावा, सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांची आयुष्यभराची असणारी पुंजीची चोरी होते ही खेदजनक घटना आहे तरी तातडीने चोरट्यांचा शोध घेऊन आडोळे परिवाराचा मुद्देमाल शोधावा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली, यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे, माजी विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर, माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, सुनील भालेराव, राहुल कातोरे, सुदर्शन बनसोडे, विकी देठे, शिवाजी कळमकर, गोरख भिंगारदिवे, प्रशांत बेल्हेकर आदी उपस्थित होते.
सुहासिनी अडोळे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, अहिल्यानगर येथुन मी, पती तसेच माझा मुलगा प्रशांत असे आम्ही सोलापुर येथे गेलो होतो. त्यानंतर माझ्या मुलाने त्याचेकडे असणारे सर्व सोन्याचे दागिने माझ्याजवळ दिल्याने मी सर्व दागिने माझ्याजवळ असणा-या बॅगमध्ये व्यवस्थीत ठेवले. त्यानंतर मी व पती असे आम्ही दोघे दिनांक 05/10/2025 रोजी पहाटे 6.00 वाजेच्या सुमारास सोलापुर येथील बसस्टँडवरुन बस मध्ये एकाच सीटवर बसून परत अहिल्यानगर येथे येत असतांना सकाळी 11.05 वाजता बस जुने बस स्टैंड अहिल्यानगर येथे आली असता गाडीमधुन काही लोक खाली उतरले व त्याचवेळी काही लोक बसमध्ये बसली त्यावेळी माझ्याजवळ तोंडाला पांढ-या रंगाचे स्कार्फ बांधलेली अंदाजे वय 22 वर्ष असलेली अंगात हिरव्या रंगाची साडी असलेली अनोळखी महीला मी बसलेल्या सीट जवळ येवून उभी राहीली. व माझ्या पतीला म्हणाली कि मला मळमळ होत आहे, मला जागा देता का, असे म्हणाल्याने माझे पती यांनी उठुन त्या अनोळखी महिलेला जागा दिली त्यावेळी ती माझ्या शेजारी बसल्याने मी माझ्याजवळ असणारी बैंग माझ्या मांडीवर घेतली त्यानंतर बस जुने स्टँडवरुन निघुन 11.20 वाजेच्या दरम्यान तारकपुर बसस्टँडवर आली असता माझ्या जवळ बसलेली अनोळखी महीला ही घाईघाईने बसमधुन खाली उतरुन तेथुन निघुन गेली. त्यानंतर मी व माझे पती असे आम्ही दोघे माझ्या घरी बोल्हेगाव येथे गेल्यानंतर मी बॅगची चैन खोलुन पाहिली असता बॅगमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने मला दिसले नाही. त्यावेळी मी माझ्या बॅगमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिणे पाहिले असता मला ते मिळुन आले नाही त्यावेळी मी व माझ्या पतीने दागिण्याचा शोध घेतला असता आम्हाला दागिने मिळुन न आल्याने माझ्या लक्ष्यात आले कि, मी जुन्या बसस्टँड वरून तारकपुर बसस्टैंड कडे येत असताना त्या दरम्यान माझ्या शेजारी बसणारी स्कार्फ बांधलेली अनोळखी महिलेने माझ्या संमतीशिवाय लबाडीच्या इरादयाने माझी नजर चुकवुन माझ्या बॅगेत ठेवलेल्या सोन्याच्या दागिण्याची चोरी करुन घेवुन गेली आहे
माझ्या बॅगमधुन चोरी गेलेल्या सोन्याचे दागिण्याचे वर्णन : 2,00,000/- रुपये किंमतीचे 05 तोळे वजनाचे सोन्याचे मोठे गंठण जु.वा.कि.अं, 1,60,000/- रुपये किंमतीचे 04 तोळे वजनाचे सोन्याचे मोठे गंठण जु.वा.किं अं., 60,000/- रुपये किंमतीचे दीड तोळा वजनाचा सोन्याचा लक्ष्मी हार जु.वा.किं अं., 40,000/- रुपये किंमतीचे 01 तोळा वजनाचा सोन्याधा लक्ष्मी हार जु.वा. किं अं., 80,000/- रुपये किंमतीचे कानातील सोन्याचे झुबे त्याचे दोन जोड प्रत्येकी 01 तोळे वजनाचे जु.वा. किं. अं, 40,000/- रुपये किंमतीचे 01 तोळा वजनाचे कानातील सोन्याचे दोन वेल जु.वा. कि अं, 20,000/- रुपये किंमतीची अर्धा तोळा वजनाची सोन्याची चैन जु. वा. किं अं, 40,000/- रुपये किमतीच्या प्रत्येकी 01 ग्रॅम वजन असणा-या पिळ्याच्या 10 सोन्याच्या अंगठ्या जु.वा. किं. अं, 2,00,000/- रुपये किंमतीच्या प्रत्येकी 01 तोळा वजनाच्या पिळयाच्या पाच सोन्याच्या अंगठ्या जु. वाकिं. अं, 8,40,000/- रुपये असा माल चोरीला गेला आहे. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले असून यावरून तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.


