बीडच्या वडवणी न्यायालयात दोन दिवसांपूर्वी धक्कादायक घटना घडली होती. सरकारी वकील विनायक चंदेल यांनी वडवणी न्यायालयात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्या प्रकरणात मोठी ट्वीस्ट समरो आली आहे. चंदेल यांच्या सुसाईट नोट आणि त्यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनंतर एका न्यायाधीशाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारी वकील विनायक चंदेल यांचा मुलगा विश्वजीत चंदेल यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीच्या आधारे आणि चंदेल यांच्या सुसाईट नोटच्या आधारे न्यायालयाचे न्यायाधीश रफीक शेख आणि एका कर्मचाऱ्यावर वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायाधीशावर गुन्हा दाखल होण्याची ही कदाचित पहिलीच घटना आहे. यामुळे संपूर्ण न्यायालयीन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चंदेल कुटुंब न्याय मिळवण्याची सातत्याने मागणी करत आहे.
बुधवारी (२० ऑगस्ट) बीडमधील वडवणी येथील स्थानिक न्यायालयात सरकारी वकील विनायक चंदेल यांनी खिडकीला दोरी बांधून आत्महत्या केली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांनी धाव घेत विनायक चंदेल यांचा मृतदेह ताब्यात घेतला होता. न्यायालयात आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली होती.
विनायक चंदेल यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी आम्हाला दाखवली नाही. त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिले आहे. त्याबाबत आमच्याकडे काही माहिती नाही. पण जे कुणीही या प्रकरणात दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विनायक चंदेल यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.


