सोलापूर : वस्तू व सेवा कर कार्यालयातील (जीएसटी) दोन राज्य अधिकाऱ्यांना जीएसटी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने येथे रंगेहाथ पकडले. महेश जरीराम चौधरी (वय ४१) आणि राज्य निरीक्षक आमसिद्ध इराप्पा बगले (५०) अशी या दोन्ही आधिकाऱ्यांची नावे आहेत.
येथील एका व्यावसायिकास त्याच्या व्यवसायासाठी जीएसटी प्रमाणपत्र हवे होते. त्याने यासाठी ‘ऑनलाइन’ पद्धतीने अर्ज केला होता. ते मिळवण्यासाठी त्याच्याकडे लाचेची रक्कम मागण्यात आली. त्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यावर येथील जुळे सोलापूर, रेणुकानगरी येथील कार्यालयात हा सापळा लावण्यात आला. यांपैकी राज्य निरीक्षक आमसिद्ध बगले याने लाच स्वीकारली. तर त्यांच्याकडून ही लाचेची रक्कम घेताना राज्य कर अधिकारी महेश चौधरी यांना पकडण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागीय पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले व पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. यामध्ये पोलीस हवालदार अतुल घाडगे, सलीम मुल्ला, पोलीस नाईक स्वामीराव जाधव व राहुल गायकवाड यांच्या पथकाने प्रत्यक्ष कारवाई केली.


