बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर आणि जामखेड पोलीस ठाण्यांत दाखल गुन्ह्यांचा तपास येथील आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. त्यांनी आतापर्यंत जिल्ह्यातील 1200 पेक्षा अधिक गुंतवणूकदारांचे या संदर्भात तक्रारी घेत जबाब नोंदविले आहे.दरम्यान, या प्रकरणामुळे अनेक गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, मजूर, व्यापारी आणि नोकरदारांचे कोट्यवधी रूपये अडकले आहेत. तक्रारदार आपल्याकडील गुंतवणूक पावत्या, आवश्यक कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेत गर्दी करत आहेत. ज्ञानराधा मल्टिस्टेट फसवणूक प्रकरणात राज्यभरात एकूण 98 गुन्हे दाखल झाले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीरामपूर आणि जामखेड पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकरणांचा तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चालू आहे. श्रीरामपूरमधील गुन्ह्याचे फॉरेन्सिक ऑडिट सुरू असून, जामखेडमधील गुन्ह्यातील ‘मनी ट्रेल’ म्हणजेच आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेण्यात आला आहे. या तपासातून फसवणुकीचा एकूण आकडा 77 कोटी रूपयांच्या घरात असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
पोलिसांनी याआधी जाहीर आवाहन करून गुंतवणूकदारांना तक्रारी नोंदविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जामखेड गुन्ह्याशी संबंधित राहुरी, जामखेड व खर्डा शाखेत गुंतवणूक केलेल्या 958 गुंतवणूकदारांनी आपली तक्रार दाखल केली आहे. या सर्वांकडून तक्रार अर्ज, पावत्या व इतर कागदपत्रे गोळा करून जबाब नोंदविण्यात आले असून, त्यामध्ये एकूण 45 कोटी रूपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सुध्दा आतापर्यंत 250 गुंतवणूकदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणात एकूण फसवणुकीचा आकडा 42 कोटी रूपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजूनही काही गुंतवणूकदार आर्थिक गुन्हे शाखेत येऊन आपली कागदपत्रे सादर करत आहेत. श्रीरामपूर प्रकरणाचा फा0ॅरेन्सिक ऑडिट अहवाल प्राप्त झाल्यानंतर अधिक तपशील पोलिसांना मिळणार आहे.


