Tuesday, November 4, 2025

अहिल्यानगर जिल्ह्यात गारपीट, अवकाळीने २८ गावांतील पिके बाधित

अहिल्यानगर : गेल्या सोमवारी (दि. ५) व मंगळवारी (दि. ६) जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपिटीचा जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील २८ गावांना फटका बसला. तेथील १३०.४३ हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे २६६ शेतकरी बाधित झाले आहेत. कांदा, भाजीपाला, आंबा, चारापिके, डाळिंब, केळी आदी पिकांचे नुकसान झाले.

जिल्हा कृषी विभागाने हा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. सर्वाधिक फटका पारनेर तालुक्याला बसला. शिवाय श्रीगोंदे, जामखेड, राहुरी, पाथर्डी, अकोले, कोपरगाव, राहता या तालुक्यातही कमीअधिक स्वरुपाचे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाचा व वादळी वाऱ्यांचा पूर्वानुमान हवामान विभागाने वर्तवला होता.

सोमवारी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीने २२ गावे बाधित झाली, त्यात २३१ शेतकऱ्यांचे १२०.३ हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांचे नुकसान झाले. ही गावे पारनेरसह पाथर्डी, राहुरी, जामखेड व श्रीगोंदे तालुक्यातील आहेत. येथील ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले क्षेत्र १११.४९ हेक्टर आहे व बाधित शेतकऱ्यांची संख्या २१३ आहे. ३३ टक्केपेक्षा कमी नुकसान झालेले क्षेत्र ८.५४ हेक्टर व बाधित शेतकऱ्यांची संख्या १८ आहे.

मंगळवारी झालेली गारपीट व अवकाळी पावसाचा फटका ६ गावांतील ३५ शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे १०.४० हेक्टर क्षेत्र बाधित झाले. हा पाऊस पाथर्डी, अकोले, कोपरगाव व राहता या तालुक्यात झाला. ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेले क्षेत्र ७.८० हेक्टर आहे. बाधित शेतकरी १२ तर ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेले क्षेत्र २.६ हेक्टर व बाधित शेतकरी संख्या २३ आहे.

हवामान विभागाने काल, बुधवार व आज, गुरुवारी जिल्ह्यात पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवला होता. काल नगर शहरासह पाथर्डी, शेवगाव परिसरात पाऊस झाला. आजही दिवसभर हवामानात बदल झालेला होता. हवेतील उकाडा कमी होऊन काहीसा गारवा पसरला होता. रात्रीच्या तापमानातही घट झालेली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles