इंडियन प्रीमियर लीग हाय-स्कोअरिंग सामन्यात, मुंबई इंडियन्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने 18 धावांनी विजय मिळवला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 4 गडी गमावून 240 धावा केल्या. प्रत्युत्तरात, मुंबई इंडियन्सने 5 गडी गमावून 222 धावा केल्या. मात्र, या सामन्यापेक्षा पांड्या बंधूंची सर्वाधिक चर्चा रंगली आहे. दोघांमध्ये मैदानावरील स्पर्धा आहे की खरंच काही बिनसलं आहे असंही बोललं जात आहे.जेव्हा हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या एकमेकांसमोर आले, तेव्हा या सामन्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या दोन भावांमधील स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित नव्हती, तर त्यांच्या वागण्यामुळे त्यांच्यातील तणावपूर्ण संबंधांबद्दलच्या चर्चांना आणखी बळ मिळाले. गोलंदाजी करताना कृणालने आपल्या लहान भावाचे स्वागत बाउन्सरने केले. हार्दिकने त्याला शांत नजरेने प्रत्युत्तर दिले. हे दोन्ही भाऊ, जे सहसा मैदानावर मजा-मस्ती करतात, ते यावेळी पूर्णपणे गंभीर दिसत होते. सामन्यातील सर्वात मोठा क्षण तेव्हा आला, जेव्हा जेकब डफीने हार्दिक पांड्याची विकेट घेतली. हार्दिक बाद झाल्यानंतर कृणाल पांड्याने केलेला आक्रमक जल्लोष पाहून चाहते चकित झाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झटपट व्हायरल झाला आणि लोकांनी त्याचा संबंध दोन्ही भावांच्या नात्याशी जोडायला सुरुवात केली.


