टिपू सुलतान याची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांच्यासमोरील अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात मराठा ठोक मोर्चा (Maratha Thok Morcha) आक्रमक झाल्याचं दिसून आलं.
सोलापूर मराठा ठोक मोर्चाच्या वतीने हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. हर्षवर्धन सपकाळ यांच्यामुळेच काँग्रेस संपली असं महेश डोंगरे म्हणाले. त्यांच्या तोंडाला जो कुणी काळे फासेल त्याला एक लाखाचं बक्षीस देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तसेच हर्षवर्धन सपकाळ यांना मराठा समाज रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशाराही देण्यात आला.
मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला होता. त्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर अखेर हटवण्यात आला. मात्र, याच वादानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यासंदर्भात एक वक्तव्य केलं. ‘टिपू सुलतानला छत्रपती शिवरायांच्य़ा समकक्ष बघितलं पाहिजे, असं सपकाळ यांनी म्हटलं. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला, अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांनी त्याच समकक्ष काम केलं, असं सपकाळ म्हणाले.


