Tuesday, November 4, 2025

जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हाहाकार ; अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत द्या खा. लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत द्या

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अहिल्यानगर : प्रतिनिधी

गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. नगर, पारनेर, श्रीगोंदे, कर्जत, जामखेड, शेवगांव, पाथर्डी तालुक्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अतिवृष्टीसम परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतांमधील पिकांचे मोठे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करून मदत जाहीर करण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खा. लंके यांनी निवेदनात नमूद केले आहे की, कपाशी, सोयाबीन, उडीद, बाजरी तसेच भाजीपाला यांसारखी सर्व हंगामी पिके अक्षरशः पाण्याखाली गेली आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दोन ते तीन फूट पाणी साचल्याने उभी पिके कुजू लागली आहेत. सततच्या पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ लागली आहे.
धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या शेतीवर तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. ओढे-नाले भरून वाहत असल्याने वाडया वस्त्यांना जोडणारे छोटे रस्ते वाहून गेले आहेत. शाळकरी मुले, शेतकरी व ग्रामस्थ यांचा दळणवळणाचा प्रश्न गंभीर झाला आहे.
या भीषण परिस्थितीत शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे. पिके नष्ट होऊन उपजीविकेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे खा. लंके यांनी मागणी केली आहे की, सर्व तालुक्यांतील शेतपिकांचे व सार्वजनिक सुविधांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना व नागरिकांना त्वरित आर्थिक मदत मिळावी, पूरसदृश व धोकादायक ठिकाणी आवश्यक त्या यंत्रणांची तातडीने मदत पोहचवावी. अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles