अहिल्यानगर शहरात जड वाहनांना प्रवेशबंदी
वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल
अहिल्यानगर, : शहराच्या हद्दीत सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत जड व हलकी माल वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. फक्त रात्री १० ते सकाळी ६ या वेळेतच अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे, अशी अधिसूचना जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी काढली आहे.
यापूर्वी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना शहरातील बाजारपेठेत दुपारी १ ते ३ या वेळेत प्रवेश दिला जात होता. मात्र, पोलीस अधीक्षकांच्या विनंतीनुसार आता हा बदल करण्यात आला असून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना फक्त रात्री १० ते सकाळी ६ या वेळेतच प्रवेश दिला जाईल. इतर सर्व वेळेत अशा वाहनांना प्रवेशबंदी राहील.
नवीन नियमांनुसार, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अन्नधान्य वाहतूक करणारी वाहने व निवडणुकीच्या कर्तव्यासाठी लागणारी वाहने याला अपवाद आहेत. मात्र, इतर कोणतीही हलकी किंवा जड मालवाहतूक करणारी वाहने सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत शहराच्या हद्दीत येऊ शकणार नाहीत.
याशिवाय, शहरातील सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यांच्या कडेला मालवाहतूक करणारी कोणतीही वाहने उभी करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. हा नियम रात्री १० ते सकाळी ६ या वेळेव्यतिरिक्त इतर सर्व वेळ लागू राहील.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग :-
मनमाड व छत्रपती संभाजीनगरकडून पुणे व कल्याणकडे जाणाऱ्या जड वाहनांना आता शहरातील मुख्य मार्गाऐवजी शेंडी-निंबळक-केडगाव मार्गे वळवण्यात येईल. तर पुण्याकडून येऊन मनमाड व छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना केडगाव-निंबळक-शेंडी मार्गे वळवावे लागेल.
हा निर्णय पोलीस अधीक्षकांच्या विनंतीनुसार व मोटार वाहन अधिनियमातील तरतुदींनुसार घेण्यात आले आहेत. शहरातील अपघातांचे प्रमाण कमी करणे, वाहतुकीत शिस्त आणणे व नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे हा या बदलामागील मुख्य उद्देश आहे.



नवीन अधिसूचना ईमेल आयडी वर पाठवा