अहिल्यानगर : श्रीरामपूरमधील हिंदुत्ववादी नेते प्रकाश चित्ते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. प्रकाश चित्ते हे भाजपच्या ओबीसी आघाडीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यांच्यासह भाजपमधील समर्थकांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे भाजपमधील अस्वस्थता प्रकट झाल्याचे मानले जाते. प्रकाश चित्ते हे विखे विरोधक म्हणून ओळखले जातात.
ठाणे येथील समारंभात प्रकाश चित्ते, त्यांच्या पत्नी दिपाली चित्ते, माजी नगरसेवक किरण लूनिया, अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बबनराव मुठे, संजय पांडे, राजेंद्र कांबळे, शशिकांत कडूसकर, मनोज हिवराळे, संजय यादव, गणेश भिसे, सुरेश असणे, सुरेश सोनवणे, अक्षय नागरे, सोमनाथ कदम, सिद्धार्थ साळवे आदी कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
प्रकाश चित्ते गेल्या ४० वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत श्रीरामपूरमध्ये भाजपचा उमेदवार नसल्यामुळे महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना (एकनाथ शिंदे) उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचाराचे काम त्यांनी केले. त्याचवेळी काँग्रेसमधून ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार ) माजी आमदार लहू कानडे यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, प्रकाश चित्ते यांच्यावर महायुतीच्या विरोधात काम केल्याचा ठपका ठेवून त्यांना भाजपमधून काढण्यात आले होते. श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचे हेमंत ओगले विजयी झाले.
पक्षातून काढल्यानंतर पुन्हा भाजपमध्ये जाण्यासाठी प्रकाश चित्ते यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. त्यानंतर आता त्यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच स्थानिक राजकीय समिकरणांना कलाटणी देणारा हा पक्षप्रवेश ठरण्याची शक्यता आहे. प्रकाश चित्ते यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने भाजपमधील अस्वस्थता उघड झाल्याचे मानले जाते.


