अहिल्यानगर: जिल्ह्यात गुंडगिरी, महिलांवरील अत्याचार, चोऱ्या, अवैध धंदे तर वाढले आहेतच परंतु अमली पदार्थांच्या तस्करीला पोलिसांचे संरक्षण आहे की काय, अशी शंका वाटते आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय ‘कॉल सेंटर’ ही जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यरत असल्याचा आरोप विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी केला आहे. जिल्हा गुन्हेगारीमुक्त करा, अशी मागणी आमदार तांबे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना पत्र पाठवून केली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नासंदर्भात आपण दि. २९ जुलैला सुध्दा जिल्हा पोलीस अधीक्षकांना स्मरणपत्र दिले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. आमदार तांबे यांनी पत्रात म्हटले की, जिल्ह्याने ऐतिहासिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक व सहकार चळवळीच्या माध्यमातून विशेष ओळख निर्माण केली आहे. जिल्ह्याला नुकतेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे नाव दिले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची एक उत्तम प्रशासक व जाणकार राज्यकर्ता म्हणून देशाला ओळख आहे. त्यांचे नाव जिल्ह्याला लाभणे सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.
एकेकाळी जिल्हा कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने राज्यातील आदर्श व गुन्हेगारीमुक्त जिल्हा म्हणून ओळखला जात असे. परंतु अलीकडच्या काळात जिल्ह्यात वाढलेली गुंडगिरी, महिलांवरील अत्याचार, चोऱ्या, अवैध धंदे, अमली पदार्थांची तस्करी यामुळे सर्वसामान्य नागरिक अस्वस्थ झाले आहेत. अमली पदार्थ तस्करीला पोलिसांचे संरक्षण आहे की काय, अशी शंका निर्माण व्हावी, इतक्या मोठ्या प्रमाणात सहजरीत्या अमली पदार्थ खेडोपाडी उपलब्ध होत आहेत. ही बाब उत्तम प्रशासक असलेल्या अहिल्यादेवींच्या जिल्ह्यासाठी अत्यंत लाजिरवाणी ठरत आहे.
जिल्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आहे की नाही आणि असेल तर ती नेमकी काय करते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर कार्यरत झालेले आहेत. हे जिल्ह्याच्या व्यवस्थेसाठी अत्यंत धोकादायक ठरणारे आहे. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील सर्व शहरांमध्ये वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात झाली आहे. वाहतूक पोलीस यंत्रणा कार्यरत आहे की नाही, अशी सर्वसामान्यांची भावना झाल्याकडे आमदार तांबे यांनी पत्रात लक्ष वेधले आहे.
जिल्ह्यामध्ये सध्या पोलीस प्रशासनाचा धाक संपलेला आहे. त्यामुळे आता पोलिसी खाक्या दाखवणे गरजेचे आहे. जिल्ह्यात वाढलेली गुन्हेगारी अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे आपण स्वतः पुढाकार घेऊन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम बनवून पूर्वीप्रमाणे जिल्हा गुन्हेगारीमुक्त करा, अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे.नाशिक शहरात सुरू करण्यात आलेल्या अभियानासारखा ‘अहिल्यानगर जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ हा उपक्रम राबवावा. जिल्हा गुन्हेगारीमुक्त करावा, अहिल्यादेवींच्या नावाने असलेला जिल्हा उत्तम प्रशासनाचा ठरावा, अशीही मागणी आमदार तांबे यांनी केली आहे.


