अहिल्यानगर-गुजरातमधून हवाला फंडींगव्दारे 20 कोटींचं कॅश लोन मिळवून देतो, असे आमिष दाखवून येथील एका हॉटेल व्यवसायिकाची तब्बल 40 लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, अहमदाबाद येथे एका बनावट ‘सीएमएस’ वाहनातून व्यवहार करण्याच्या बहाण्याने व्यवसायिकाच्या डोक्यावर बंदूक लावून धमकावले.
याप्रकरणी रूईछत्तीसी (ता. अहिल्यानगर) येथील व्यवसायिक विशाल रमेश भांबरे (वय 33) यांनी सोमवारी (21 जुलै) कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भांबरे यांनी फिर्याद दिली आहे की, त्यांनी 2018 मध्ये पिरामल फायनान्सकडून लोन घेतले होते. त्यावेळी लोनचा हप्ता घेण्यासाठी येणार्या जयंत मधुकर कंठाळे (रा. हातमपुरा, अहिल्यानगर) याच्याशी ओळख झाली. जयंतच्या माध्यमातून विशाल यांची ओळख सागर ऊर्णे, योगेश घुले आणि गणेश शिंदे (पूर्ण नावे, पत्ता माहिती नाही) यांच्याशी झाली. जयंत कंठाळे याने विशालला सांगितले की, गुजरातमधील एक प्रायव्हेट फंडींग कंपनी हवाला मार्फत किमान 20 कोटी रूपये रोख स्वरूपात देते. त्यासाठी फक्त प्रोसेसिंग फी म्हणून 20 लाख रूपये आणि ‘सीएमएस’ वाहन व इन्शुरन्ससाठी 20 लाख रूपये भरावे लागतील, असा प्रस्ताव ठेवण्यात आला.त्यानुसार विशालने सुरूवातीला 10 लाख रूपये टोकन म्हणून सागर ऊर्णेला दिले. 2 मार्च 2025 रोजी विशाल, जयंत, सागर आणि योगेश हे चौघे अहमदाबाद येथे पोहोचले. फॉर्च्यून बिझनेस हबमधील ‘आपणा भारत’ नावाच्या ऑफिसमध्ये अनुराग पटेल या व्यक्तीशी त्यांची भेट झाली. 5 मार्च रोजी कोर्ट आवारात एका अनोळखी व्यक्तीने लोन प्रोसेसिंगसाठी 20 लाख रूपये घेतले, आणि त्याविरूध्द एक बनावट पावती दिली.
यानंतर 9 एप्रिल रोजी पुन्हा अहमदाबादमध्ये बोलावून, ‘सीएमएस’ वाहन आणि चार बनावट बंदूकधारी गार्डच्या उपस्थितीत डोक्यावर बंदूक ठेवून 10 लाख रूपये जबरदस्तीने घेतले गेले. पैसे दिल्यानंतर संशयित आरोपींनी लोन व्यवहार रद्द झाला असे सांगत पळ काढला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी जयंत मधुकर कंठाळे, सागर ऊर्णे, योगेश घुले, गणेश शिंदे, अनुराग पटेल व अहमदाबादमधील अनोळखींविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.


