मलाही मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण योग जुळून येत नाही, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली. ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025’च्या उद्घाटनाप्रसंगी त्यांनी हे वक्तव्य केले होते. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलंय. जर या सरकारमध्ये त्यांना मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली तर पुतण्या म्हणून मी त्याचं स्वागतच करेल, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
रोहित पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे की, ते अनेक वर्ष उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्या पदाच्या वर मुख्यमंत्रीपदच राहते. सहाजिकच तुम्ही इतके वर्ष दोन नंबरच्या पदावर राहिला असाल तर तुमची इच्छा मुख्यमंत्रीपदाची व्हावी.
…तर मी नक्कीच स्वागत करेल : रोहित पवार
या सरकारच्या माध्यमातून अजितदादा यांना संधी दिली जात असेल तर त्यांना आवडेलच. तसेच कुटुंबाला आणि कार्यकर्त्यांना देखील आवडेल. मी त्यांचा पुतण्या म्हणून मला सुद्धा ती गोष्ट आवडेल. ते आता वेगळ्या सरकारमध्ये आहेत. पण अजित पवारांना मुख्यमंत्री पद मिळत असेल तर त्या गोष्टीचं मी नक्कीच स्वागत करेल. आनंद देखील व्यक्त करेल, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.
दरम्यान, गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025’च्या उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटले होते की, राही भिडे म्हणाल्या भविष्यात या महाराष्ट्रात एखादी महिला मुख्यमंत्री झाली पाहिजे. आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असतं. पण शेवटी तो योग जुळून यावा लागतो. कारण मलाही गेल्या अनेक वर्षांपासून वाटतं की मी मुख्यमंत्री व्हावं. पण कुठे जमतंय? असे त्यांनी म्हटले होते. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत आपले शब्द मागे घेतले होते. मुख्यमंत्री होण्याचं वक्तव्य मी गंमतीत केलं होतं, ते मी गंभीरपणे म्हटलं नव्हतं. मात्र, तरीही मी माझे शब्द मागे घेत आहे, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं आहे. सध्या फडणवीस यांच्या मागे 145 पेक्षा अधिक आमदारांचे पाठबळ आहे. याआधी एकनाथ शिंदे यांना आमचा पाठिंबा होता आणि त्याआधी उद्धव ठाकरे यांच्यामागेही आमचं पाठबळ होतं, असंही त्यांनी म्हटलं.


