महाकुंभमेळ्यात आयआयटी बाबा म्हणून प्रसिद्ध झालेल्या अभय सिंहने आता लग्न केलं आहे. फेब्रुवारी महिन्यात अभय सिंहचं लग्न झालं आहे. कर्नाटकमधल्या इंजिनिअर मुलीशी त्याने लग्न केलं आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच आयआयटी बाबा पत्नीसह दिसला आहे. त्यांचा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होतो आहे. १५ फेब्रुवारीला अभय सिंह उर्फ आयआयटी बाबा आणि प्रतीका या दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर अभय सिंह त्याच्या वडिलांना भेटायलाही गेला होता. १५ फेब्रुवारीला या दोघांनी अघंजर या ठिकाणी असलेल्या महादेव मंदिरात लग्न केलं. त्यानंतर १९ फेब्रुवारीला कोर्ट मॅरेज केलं.
अभय सिंहचे वडील वकील आहेत. महाकुंभमेळ्यात आयआयटी केलेला साधू तरुण दिसल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. सोशल मीडियावरही या आयआयटी बाबाची चांगलीच चर्चा झाली होती.अभय सिंह उर्फ आयआयटी बाबाच्या पत्नीचं नाव प्रतीका आहे. ती कर्नाटकमध्ये राहते. आयआयटी बाबाची पत्नीही इंजिनिअर आहे. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत प्रतीकाने सांगितलं की एक वर्षापूर्वी तिची आणि अभयची भेट झाली. मला अभयचा स्वभाव खूपच आवडला. त्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता आम्ही आमच्या सासू-सासऱ्यांना भेटायला झज्जरला आलो आहोत. आता आम्ही सनातन विद्यापीठ सुरु करण्याचा विचार करतो आहोत असंही प्रतीकाने सांगितलं.
महाकुंभमेळ्यात आयआयटी बाबा नावाचा तरुण साधू प्रसिद्ध झाला होता.सोशल मीडियावर त्याच्या नावाची चर्चा होती. अभयचा जन्म हरियाणातील झज्जरमध्ये झाला. त्याने सुरुवातीचं शिक्षण हे हरियाणात घेतलं होतं. १२ वीनंतर त्याने आयआयटी जेईईची तयारी केली. त्यानंतर २००८ मध्ये अभय सिंह आयआयटी जेईई मध्ये ऑल इंडिया रँक ७३१ मिळवली. त्यानंतर आयआयटी मुंबईतून एयरोस्पेस इंजिनिअरींगलाही त्याने प्रवेश घेतला होता. कॅनडातील एअरक्राफ्ट तयार करणाऱ्या कंपनीत तो नोकरीही करु लागला होता. कोव्हिड काळात लॉकडाऊन लागला तेव्हा अभय भारतात परतला होता. त्यावेळी त्याने सांगितलं की वर्षाला ३५ लाख रुपयांचं पॅकेज असलेली नोकरी सोडून आपण भारतात परतलो आहोत. अभयचे वडील वकील आहेत. तर त्याची आई गृहिणी आहे. कुंभमेळ्यात अभयची ओळख आयआयटी बाबा अशी झाल्याने तो रातोरात प्रसिद्ध झाला होता. आता त्याच्या लग्नाची बातमी समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.


