अहिल्यानगर -येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या पथकाने राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथे विनापरवाना खत विक्री करणार्या मे. चैतन्य हॉर्डवेअर दुकानावर छापा टाकून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत खत साठा जप्त केला आहे. या कारवाईत एकूण 7 लाख 49 हजार 730 रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले.
10 जून रोजी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गवसाने, आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली खत निरीक्षक व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक राहुल ढगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने, मे. चैतन्य हॉर्डवेअर, वळण रस्ता, पाथरे खुर्द येथे छापा टाकला. या कारवाईदरम्यान तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, पंचायत समिती कृषी अधिकारी गणेश अनारसे हेही उपस्थित होते. गोदामाची पाहणी केली असता, मोठ्या प्रमाणावर 50 किलोच्या गोण्या, 10 किलोच्या बादल्या आणि 1 लिटरच्या खताच्या बाटल्या विक्रीसाठी ठेवल्या असल्याचे आढळून आले.
सदर ठिकाणचे संचालक संदीप यमाजी जाधव यांच्याकडे खत विक्री किंवा साठवणुकीसाठी कोणतेही वैध परवाने अथवा आवश्यक दस्तऐवज नसल्याचे तपासणीतून उघडकीस आले आहे. त्यामुळे पंचसाक्षीदारांच्या उपस्थितीत पंचनामा करून संपूर्ण साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणात खत नियंत्रण आदेश 1985 आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत तरतुदींचा भंग झाल्याचे निदर्शनास आले आहे. सदर ठिकाणी तत्काळ खत विक्री बंदी आदेश बजावण्यात आला असून, दोषींवर कायदेशीर कारवाई केली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचा कृषी विभाग कटिबध्द आहे. शेतकर्यांनी अधिकृत परवाना धारक कृषी सेवा केंद्राकडूनच खते, बियाणे व कीटकनाशके खरेदी करावीत. खरेदीच्या वेळी रीतसर पावती घेऊन ती जतन करावी. अशा प्रकरणांबाबत तक्रारी असल्यास कृषी विभागाशी थेट संपर्क साधावा.
– सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहिल्यानगर.


