पाथर्डी: तालुक्यातील जिरेवाडी गावात विनापरवानगी सावकारी करणार्या दोघा सावकारांवर सहकार विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. गणेश नवनाथ आंधळे, अनिता रामराव आंधळे उर्फ अनिता नागेश जायभाये यांच्याविरुद्ध सहकार विभागाकडे तक्रार आली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली.
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 च्या कलम 16 अंतर्गत ही धडक कारवाई सावकारांचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली, पाथर्डीचे सहायक निबंधक गोकुळ नांगरे यांच्या अंमलबजावणीखाली पार पडली.
या धडक कारवाईत एक चारचाकी वाहन, एक खरेदीखत, तीन उसनवारी पावत्या आणि तीन कोरे धनादेश जप्त करण्यात आले. तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली असून, पुढील चौकशी पाथर्डीतील सहायक निबंधक अधिकारी गोकुळ नांगरे यांच्याकडून होणार आहे.
पोलिस बंदोबस्तात आणि पंचांच्या उपस्थितीत दोन पथकांनी ही कारवाई केली. पहिल्या पथकाचे नेतृत्व पारनेर येथील सहकार अधिकारी आर.बी. वाघमोडे यांनी केले. त्यांच्यासोबत शेवगाव येथील सहकार अधिकारी आर.एम. काळे, सहायक सहकार अधिकारी वाय.एस. शेळके, एस.ए. थोरात यांनी सहभाग घेतला. दुसर्या पथकाचे नेतृत्व नगर तालुक्याचे मुख्य लिपीक ए. ए. शेख यांनी केले, तर व्ही.आर. चौधरी, सहायक सहकार अधिकारी व्ही.बी. पाखरे यांनी सहाय्य केले.
या कारवाईने सहकार विभाग अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी गंभीर असल्याचे दिसत आहे. मात्र, पाथर्डी तालुक्यात 5 ते20 रुपये टक्के शेकड्यापर्यंत व्याज आकारणारी मोठ्या सावकारांची धनदांडगी सावकारी मसल पावर आणि राजकीय छत्राखाली जोमात सुरू आहे.
काही सावकार राजकीय पाठबळाच्या जोरावर बिनधास्तपणे गैरकायदा धंदा चालवत असल्याने सामान्य जनता हवालदिल झाली आहे. छोट्या सावकारांवर कारवाई झाली, तरी मोठ्या माशांवर कारवाई कधी होणार, असा प्रश्न सर्वसामान्यांमधून पुन्हा एकदा उपस्थित होत आहे.


