Wednesday, October 29, 2025

अहिल्यानगरमध्ये 4 सख्ख्या बहि‍णींवर नातलगाने केला लैंगिक अत्याचार, लग्न झालेल्या तरुणीलाही सोडलं नाही

अहिल्यानगर : राहुरी तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका नराधमाने एकाच कुटुंबातील चार बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा आरोपी चारही बहिणींचं शारीरिक शोषण करत होता. धक्कादायक म्हणजे, हा नराधम त्यांचा लांबचा नातेवाईक असल्याचं तपासातून उघड झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीसह त्याच्या पत्नीला देखील अटक केली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आई-वडील विभक्त झाल्याने एका कुटुंबातील चार बहिणींचा सांभाळ करण्याची जबाबदारी दूरच्या नातेवाईकाकडे सोपवण्यात आली होती. मात्र, मुलींचे रक्षण करण्याऐवजी याच पालनकर्त्यानेच त्यांच्यावर भक्षक बनत त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. या प्रकरणी राहुरी पोलिसांनी नराधम आरोपीसह त्याच्या पत्नीला अटक केली असून, त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी या कारवाईची माहिती दिली आहे.

या प्रकरणाचा पर्दाफाश स्नेहालय संस्थेच्या उडान प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी केला. पीडित मुलींपैकी सज्ञान असलेली एक मुलगी काही दिवसांपूर्वी बहिणींना भेटण्यासाठी आली होती. यावेळी आरोपीने पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीने हा प्रसंग आपल्या पतीला सांगितला, त्यानंतर दोघांनी तातडीने स्नेहालय संस्थेशी संपर्क साधला. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार राहुरी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिसांनी वेगाने हालचाल करत चौघी मुलींची सुटका केली आणि आरोपी दांपत्याला बेड्या ठोकल्या.दरम्यान, चौघी पीडित बहिणी नाशिक जिल्ह्यातील असून, त्यापैकी एक मुलगी सज्ञान आहे, तर इतर तिघी अनुक्रमे १६, १४ आणि १० वर्षांच्या अल्पवयीन आहेत. चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या सज्ञान मुलीवर आरोपीने वारंवार लैंगिक अत्याचार केला होता. नंतर या पीडितेच्या धाडसामुळेच प्रकरण उघडकीस आलं. तपासात हेही स्पष्ट झालं की, आरोपीने केवळ तिच्यावरच नव्हे, तर तिच्या तीन अल्पवयीन बहिणींवरही अनेक वेळा लैंगिक अत्याचार केले होते.

या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आपल्या देखरेखीखाली असलेल्या अल्पवयीन मुलींवर एका नातेवाईकाने वारंवार अत्याचार करणे ही संतापजनक बाब असल्याचे सामाजिक क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपी दांपत्याला अटक केली आहे. पुढील तपास सुरू असून, या गंभीर गुन्ह्याला जबाबदारांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles