कोपरगाव -जास्त व्याजदराचे आमिष दाखवून आणि पतसंस्थेचा बनावट बुरखा पांघरून सामान्य शेतकरी व व्यापाऱ्यांची लूट करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा कोपरगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. साई बालाजी तालुका नागरी सहकारी पतसंस्थेच्या नावाखाली गुंतवणुकीचे जाळे विणून खिर्डी गणेश येथील एका ज्येष्ठ शेतकऱ्याची तब्बल १३ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य आरोपी प्रवीण शंकर वरगुडे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कोपरगाव न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, यातून फसवणुकीचे एक मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खिर्डी गणेश येथील रहिवासी सुखदेव लीलाबा लासुरे (वय ६७) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. आरोपी प्रवीण वरगुडे (रा. सवंत्सर) याने लासुरे यांचा विश्वास संपादन करून पतसंस्थेत मुदतठेव ठेवल्यास भरघोस व्याज मिळेल, असे आमिष दाखवले. या भूलथापांना बळी पडून लासुरे यांनी वेळोवेळी १३ लाख ५ हजार रुपये पतसंस्थेत जमा केले. मात्र आरोपीची भूक एवढ्यावरच थांबली नाही; त्याने विजय प्रभाकर खोडगे (रा. नाशिक) याला शेअर मार्केट सल्लागार म्हणून समोर आणले आणि लासुरे यांच्या मुलाकडूनही गुंतवणुकीच्या नावाखाली ७ लाख ५० हजार रुपये उकळले.काही काळानंतर लासुरे यांनी आपल्या कष्टाचे पैसे परत मागितले असता, आरोपींनी टाळाटाळ सुरू केली. संशय आल्याने लासुरे यांनी पतसंस्थेच्या कार्यालयात चौकशी केली असता, ती संस्थाच बंद असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाणे गाठले. १३ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेला प्रवीण वरगुडे अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.
प्रवीण वरगुडे आणि विजय खोडगे यांनी अशाच प्रकारे कोपरगाव परिसरातील अनेक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची चर्चा सध्या शहरात रंगली आहे. पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सोनवणे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.या गुन्ह्यात आणखी किती लोकांचे पैसे अडकले आहेत आणि या रॅकेटचे धागेदोरे कुठपर्यंत पसरले आहेत, हे आता पोलीस कोठडीतील चौकशीतून स्पष्ट होईल. फिर्यादीच्या वतीने अॅड. अनुप ठोळे न्यायालयात काम पाहत आहेत.


