अहिल्यानगर – मुलीला रेल्वे मध्ये क्लर्कची नोकरी लावण्याचे आमिष दाखवत नगरमधील सेवानिवृत्त व्यक्ती कडून वेळोवेळी सुमारे १८ लाख रुपये घेतले. त्यानंतर बनावट नियुक्ती पत्र देवून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात ६ जणांच्या टोळी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विजय वामन केळगंद्रे (वय ६०, रा. संतोष रेसिडेन्सी, चिपाडे मळा, सारसनगर, मूळ रा. खरवंडी कासार ता. पाथर्डी) यांनी ४ सप्टेंबर रोजी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे पशुसंवर्धन विभागात नोकरीला होते. २ वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांची आरोपी अनिल भास्कर पडघलमल (रा. डॉ. वने हॉस्पिटल जवळ, राहुरी) याच्याशी ओळख होती, त्याने त्यांच्या मुलीला रेल्वे खात्यात क्लर्कची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत त्यांची ओळख संतोष चंद्रकांत कटारे (रा. मुरबाड रोड, कल्याण, ठाणे) व सुकुमार पवार (रा. बारागाव नांदूर, ता.राहुरी) यांच्याशी करून दिली.
मुलीला नोकरी लावण्यासाठी या तिघांनी आणि त्यांच्या अनोळखी ३ साथीदारांनी फिर्यादी केळगंद्रे यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या कडून १७ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट २०२५ दरम्यान नगरमधील वाडियापार्क, मुंबई मध्ये व्ही.टी.स्टेशन परिसरातील एका हॉटेल मध्ये आणि एका हॉस्पिटल मध्ये वेळोवेळी एकूण १८ लाख रुपये घेतले. त्यानंतर त्यांच्या मुलीच्या नावे रेल्वे खात्यात क्लर्क (वर्ग ३) चे नियुक्तीपत्र दिले. ते नियुक्ती पत्र घेवून फिर्यादी हे मुलीला कामावर रुजू करण्यासाठी घेवून गेले असता, ते नियुक्तीपत्र बनावट असल्याचे त्यांना समजले. त्यामुळे या ६ आरोपींनी आपली फसवणूक केल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी ६ जणांच्या विरुद्ध बीएनएस कलम ३१६ (२), ३१८ (४), ३३६ (२), ३४० (२), ३ (५) प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.