अहिल्यानगर 0एकीकडे आर्थिक गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय शोधणार्या नागरिकांना रोजच नवनव्या फसवणुकींचा सामना करावा लागत आहे. सावेडीतील दोन पतसंस्थेच्या नावाने सहा व्यक्तींना तब्बल 63 लाख 82 हजार रूपयांना गंडा घालण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकरणी अतुल दत्तात्रय खामकर (वय 31, रा. गवळीवाडा, भिंगार) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संतोष हस्तीमल मावानी (रा. दत्त मंदिराजवळ, सिव्हिल हाडको, सावेडी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतुल खामकर यांचे मारूतीराव मिसळ नावाचे हॉटेल सावेडीतील आकाशवाणी केंद्राजवळ गेली 15 वर्षांपासून सुरू आहे. त्यांची संतोष मावानी याच्याशी ओळख सुमारे 10 वर्षांपूर्वी झाली होती. संतोषने सुरूवातीला एका अज्ञात पतसंस्थेच्या माध्यमातून आणि नंतर दुर्गाशंकर मल्टीस्टेट पतसंस्थेचे पुस्तक देऊन डेली कलेक्शन सुरू करण्यात आले.संतोष दररोज अतुल यांच्याकडून 5 हजार रूपये गोळा करत होता. त्याने हॉटेल व्यवसायामुळे जमा झालेल्या फाटक्या नोटा सहज बदलून देत अतुल यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर एका वेळेस संतोषने अतुल यांना सांगितले की, 15 लाखांची ठेव केल्यास चांगला परतावा मिळेल. यावरून अतुल यांनी आपले जमा झालेले 5 लाख आणि एचडीएफसी बँकेतून स्वतःचे आणखी 10 लाख युनियन बँकेत असलेल्या संतोष मावानीच्या खात्यावर ऑनलाईन पाठवले.
दरम्यान, संतोषने 29 जून रोजी पुस्तक घेऊन तपासून आणतो असे सांगून हॉटेलमधून गुप्तपणे निघून गेला. दुसर्या दिवशी तो रात्री घर सोडून पसार झाल्याचे निदर्शनास आले. त्याचा मोबाईल सतत बंद असून, नातेवाईकांकडूनही तो कोठे गेला याची माहिती मिळाली नाही. अतुल यांच्यासह सहा जणांची त्याने फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
फिर्यादी अतुल खामकर यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार संतोष मावानी याने केवळ त्यांची नव्हे तर इतरही लोकांची फसवणूक केली आहे. यामध्ये वासुदेव व्दारकदास किंगर (रा. म्युन्सिपल हाडको, सावेडी) यांची 2 लाख 20 हजार, महेशकुमार बाळासाहेब नाईक (रा. सिव्हिल हाडको, सावेडी) यांची 6 लाख 82 हजार, हरमितसिंग हरीसिंग चावला (रा. गोंविदपुरा, अहिल्यानगर) यांची 8 लाख, कमल चमनलाल कंत्रोडा (रा. तारकपूर) यांची 22 लाख 80 हजार व डॉ. संतोष सिताराम गायकवाड (रा. माणिकनगर, अहिल्यानगर) यांची 9 लाख रूपये अशी एकूण 63 लाख 82 हजार रूपयांची फसवणूक झाली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.


