अहिल्यानगर – जिममध्ये व्यायाम करण्यासाठी येणार्या महिलांकडे एकटक पाहिल्याचा जाब विचारल्यामुळे एका जिम ट्रेनरला बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना शहरात घडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पोलीस दलातील अंकुश जाधव आणि विवेक आहिरे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादी सदाम हुसेन इद्रीस शेख हे कोहिनूर मॉल येथील एका जिममध्ये व्यवस्थापक आणि प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या जिममध्ये येणार्या काही महिला सदस्यांनी आरोपींच्या वर्तनाबाबत तक्रार केली होती. यावरून शेख यांनी अंकुश जाधव याला समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्याने वर्दीचा माज दाखवत शेख यांना खोटी कारवाई करण्याची धमकी दिली.
३१ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास शेख हे कोठला चौक परिसरात गेले असता, आरोपींनी त्यांना अडवले. ओळखीचा फायदा घेऊन त्यांना चारचाकी वाहनात बसण्यास सांगितले आणि तिथेच अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर कुरेशी हॉटेलच्या पाठीमागे नेऊन दोघांनी त्यांना लाथाबु क्क्यांनी बेदम मारहाण केली. पीडित तरुण तेथून सुटून जात असताना पुन्हा नटराज हॉटेलसमोर त्याला अडवून मारहाण करण्यात आली. महिलांच्या सन्मानासाठी आवाज उठवणार्या जिम ट्रेनरवरच अशा प्रकारे हल्ला झाल्याने शहरात संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन तपास सुरू केला आहे.


