राहुरी तालुक्यातील वळण येथे शनिवार दि. ४ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास किरकोळ वादातून एका तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी संशयित आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले आहे.
कृष्णा ऊर्फ दादासाहेब शंकर कुलट (वय २६) रा. वळण, ता. राहुरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ४ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ४ वाजता वळण येथील दत्त मंदिराजवळ कृष्णा उर्फ दादासाहेब कुलट व संशयित आरोपी उद्धव नंदलाल खुळे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर उद्धव खुळे याने कृष्णा कुलट याच्यावर धारदार चाकूने वार केले. जखमी अवस्थेतील कुलट याला तातडीने राहुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले.
घटनेनंतर मृताच्या नातेवाईक व मित्रपरिवाराने रुग्णालय परिसरात तसेच राहुरी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिक्षक जयदत्त भवर व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली व परिस्थिती नियंत्रणात आणली, पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित आरोपी उद्धव नंदलाल खुळे याला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर वळण परिसरात तणावपूर्ण शांतता असून रात्री उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत कृष्णा ऊर्फ दादासाहेब शंकर कुलट याच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे जवळपास सहा गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. तसेच त्याच्यावर प्रतिबंधक कारवाईही करण्यात आलेली होती.


