Tuesday, October 28, 2025

आशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान फायनलमध्ये, सूर्यकुमार यादवला बाहेर बसावं लागणार?

पाकिस्तानच्या संघाने गुरुवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यात बांगलादेशचा 11 धावांनी निसटता पराभव करत आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान या स्पर्धेत तिसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. भारत-पाक यांच्यातील युद्धामुळे मुळात भारताने पाकिस्तानशीसामना खेळावा की खेळू नये, असा संभ्रम होता. मात्र, आता येत्या रविवारी भारतीय संघ पुन्हा एकदा पाकिस्तानशी मैदानात दोन हात करणार आहे.

यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा याच्याशी नाणेफेकीच्या वेळी हात मिळवला नव्हता. त्यानंतर भारतीय संघाने सामना संपल्यानंतरही पाकिस्तानच्या खेळाडुंशी हात मिळवायला नकार दिला होता. यावरुन पाकिस्तान चांगलाच चवताळला होता. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने भारताच्या ‘या’ कृतीविषयी आणि सूर्यकुमार यादवच्या पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबाबातच्या टिप्पणीविषयी आयसीसीकडे तक्रार केली होती. आयसीसीच्या समितीने सूर्यकुमार यादवला चौकशीसाठी बोलावून ताकीद दिली होती. त्यानंतर आयसीसी सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई करणार, अशी चर्चा रंगली होती. कदाचित भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादव याला खेळू दिले जाणार नाही, अशा चर्चांनाही उधाण आले होते. त्यामुळे भारतीय क्रिकेटरसिकांची धाकधूक वाढली होती.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ) सूर्यकुमार यादव याला सध्या फक्त ताकीद दिली आहे. मात्र, त्याच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, ही कारवाई दंडात्मक स्वरुपाची असेल. कदाचित सूर्यकुमार यादव याच्या मानधनातील काही रक्कम कापली जाऊ शकते. मॅच रेफरी आणि माजी क्रिकेटपटू रिची रिचर्डसन यांनी सूर्यकुमार यादवची चौकशी केली होती. यावेळी त्याठिकाणी बीसीसीआयचे सीओ हेमंग अमीन आणि सुमीत मल्लापुरकर हेदेखील उपस्थित होते. रिचर्डसन यांनी बीसीसीआयला एक ई-मेल पाठवला होता. यामध्ये म्हटले होते की, सूर्यकुमार यादवचे वक्तव्य क्रिकेटची प्रतिमा मलीन करु शकते. मात्र, सूर्यकुमार यादव याची ही कृती गुन्हेगारी श्रेणीतील नव्हती. आयसीसीच्या नियमानुसार हे पहिल्या स्तराच्या नियमाचे उल्लंघन आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधित खेळाडूवर बंदी आणली जात नाही. या खेळाडुला आर्थिक दंड ठोठावला जाऊ शकतो किंवा डिमेरिट पॉईंटस दिले जातात. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादव संघाबाहेर बसण्याची शक्यता अजिबात नाही.

भारतानं पाकिस्तान यांच्यात 14 सप्टेंबरला आशिया कप स्पर्धेतील पहिला सामना झाला होता. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवल्यानंतर सूर्यकुमार यादवनं पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये पहलागम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली होती. सूर्यकुमार यादव म्हणाला होता की ,”मला काही सांगायचं आहे आणि त्यासाठी हे ठिकाण अधिक योग्य आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबांसोबत आम्ही ठामपणे उभे आहोत. हा विजय आम्ही आपल्या शूरवीर सैन्यदलाला समर्पित करू इच्छितो, ज्यांनी अतुलनीय शौर्य दाखवले. ते आम्हाला सतत प्रेरणा देत राहोत आणि आम्हालाही संधी मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवण्यासाठी आणखी कारण देता यावं, अशी आम्ही आशा करतो”.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles