पाकिस्तानने टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये 15 फेब्रुवारीला भारताविरुद्ध सामना न खेळण्याचा निर्णय घेतला असला, तरीही त्या दिवशी टीम इंडियाला कोलंबोला जाणार आहे. सामना फायनलचा असला तरी पाकिस्तानने भारताशी न खेळण्याचा हट्ट कायम ठेवला, तरीही भारतीय संघ आर. प्रेमदासा स्टेडियमवर जाणार आहे.
टीम इंडिया कोलंबोला जाणार कारण काय?
यामागचं कारण असं की, आयसीसीच्या नियमांनुसार एखादी टीम सामना खेळण्यास नकार देत असली, तरी दुसऱ्या टीमने टॉसच्या वेळी मैदानावर हजर राहणं बंधनकारक आहे. जर भारतीय संघ मैदानावर उपस्थित राहिला नाही, तर सामना रद्द ठरून दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण मिळतील. मात्र भारताला पूर्ण 2 गुण हवे असतील, तर मैदानावर उतरावंच लागेल.
आयसीसी प्रोटोकॉलनुसार सामना संदर्भातील अंतिम निर्णय मॅच रेफरी घेतात. एएनआयच्या वृत्तानुसार, सूत्रांनी सांगितलं आहे की टीम इंडिया सर्व आयसीसी नियमांचं पालन करेल. ठरलेल्या वेळापत्रकानुसार सराव करेल, प्रेस कॉन्फरन्स घेईल आणि वेळेत आर. प्रेमदासा स्टेडियमवर पोहोचेल. त्यानंतर मॅच रेफरी सामना रद्द करण्याचा निर्णय कधी घेतात, याची वाट पाहिली जाईल.पाकिस्तान सरकारने 1 फेब्रुवारी रोजी जाहीर केलं की, पाकिस्तान संघ टी-20 वर्ल्ड कप खेळेल, मात्र भारताविरुद्ध सामना खेळणार नाही. मात्र या निर्णयामागचं ठोस कारण सरकारकडून सांगण्यात आलेलं नाही. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डवर (PCB) आयसीसीकडून कडक कारवाई होण्याची शक्यता आहे. आयसीसीने अधिकृत निवेदन जारी करत पीसीबीला आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा इशारा दिला आहे.पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी याआधी बांगलादेशच्या बाजूने उभं राहण्याचा दावा केला होता. त्यांनी एक्स (माजी ट्विटर) वर पोस्ट करत सांगितलं होतं की, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ 2 फेब्रुवारीपर्यंत अंतिम निर्णय घेतील. 1 फेब्रुवारीलाच सरकारने निर्णय जाहीर केला. नक्वी यांनी सुरक्षेचं कारण दिलं होतं, मात्र सरकारच्या घोषणेत याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.


